प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामातील चौथ्या दिवशीचा पहिला सामना यु मुंबा आणि युपी योद्धाज या संघात पार पडला. पहिल्यापासून अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात अखेरीस यु मुंबाने संघाने 30-23 असा विजय मिळवला. मुंबईच्या सर्व सातही खेळाडूंनी विजयात योगदान देत स्पर्धेत संघाचे खाते खोलले.
आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आलेल्या यु मुंबाने सामन्यात वेगवान सुरुवात करत चार गुण मिळवले. कर्णधार सुरेंदर सिंगसह डिफेन्समध्ये इतरांनी उपयुक्त योगदान दिले. युवा किरण आणि रिंकू यांनी डिफेन्समध्ये तीन गुण मिळवले. तर रेडरमध्ये एकटा गुमान सिंग तीन गुण घेऊ शकला. यूपी संघासाठी कोणीही दोन पेक्षा जास्त गुण न मिळवू शकल्याने मध्यंतराला मुंबईकडे 14-9 अशी आघाडी होती.
दुसऱ्या सत्राची सुरुवात झाली तेव्हा मुंबईने आपले आक्रमण असेच सुरू ठेवले. परदीप नरवाल व सुरेंदर गिल या यूपीच्या दोन्ही प्रमुख रेडर्सला रोखत मुंबईने सामन्यात आपली आघाडी वाढवत ठेवली. तिसाव्या मिनिटाला त्यांनी युपीला ऑल आऊट करण्यात यश मिळवले. त्यांनी आपले आक्रमण सुरू ठेवत आघाडी नेहमीच सात गुणांच्या पुढे ठेवली. पूर्ण वेळानंतर मुंबईने 30-23 असा विजय मिळवत पूर्ण गुण आपल्या नावे केले.
मुंबईसाठी डिफेन्समध्ये सर्वांनी योगदान दिले. कर्णधार सुरेंदरने 4, हरेंद्रने 2, किरण मगर व रिंकूने प्रत्येकी 3 गुण कमावले. रेडर गुमानने 5 तर जय भगवान व आशिष यांनी अनुक्रमे 6 व 4 गुण आपल्या नावे केले.
दुसरीकडे यूपी संघाला प्ररदीप नरवाल व सुरेंदर गिल यांचे अपयश भोवले. युवा डिफेंडर सुमित संघासाठी आशेचा किरण ठरला.