रत्नागिरीमधील दोन बुद्धिबळपटूंना आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन

Edited by: मनोज पवार
Published on: June 18, 2025 13:12 PM
views 77  views

रत्नागिरी : येथील बाल बुद्धिबळपटू विहंग सावंत व युवा खेळाडू कौस्तुभ हर्डीकर यांनी नुकत्याच झालेल्या विविध बुद्धिबळ स्पर्धांत चमकदार कामगिरी करत जागतिक बुद्धिबळ संघटनेचे जलद फिडे मानांकन प्राप्त केले आहे.

जेमतेम साडे आठ वर्षे वयाच्या, इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विहंगने मडगाव गोवा येथे झालेल्या युनिटी क्लब तृतीय अखिल भारतीय जलद फिडे मानांकन स्पर्धेत तीन फिडे मानांकित खेळाडूंविरुद्धचे सामने जिंकत १४९८ एवढे जलद फिडे मानांकन प्राप्त केले. 

विनोद पावरा यांनी विहंगला बुद्धिबळाची तोंडओळख करून दिली. प्रतिस्पर्ध्याचे वय, रेटिंग इत्यादी गोष्टींचे दडपण न घेता विहंग आक्रमक चाली रचण्याच्या प्रयत्नात असतो.

युवा बुद्धिबळपटू कौस्तुभ श्रीप्रकाश हर्डीकर याने पुणे येथे आयोजित एसव्हीआयएस प्रथम खुल्या जलद फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत १४५७ इतके जलद फिडे मानांकन प्राप्त केले. कौस्तुभला बुद्धिबळ खेळाची विलक्षण आवड आहे.

 कॉलेजचा व्यस्त अभ्यासक्रम सांभाळून कौस्तुभ सतत बुद्धिबळाचा अभ्यास करण्यासाठी प्रयत्नशील असतो. विहंग व कौस्तुभ रत्नागिरी येथील बुद्धिबळ प्रशिक्षक चैतन्य भिडे यांच्या मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमीत बुद्धिबळाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतात.