४० वर्षांचे क्रिकेटर पुन्हा गाजवणार क्रिकेटचं मैदान

दोडामार्ग तालुक्यातील दिग्गज खेळाडूंचा खेळ पुन्हा पहाता येणार नवख्या खेळाडूंना | ४० वर्षांवरील खेळाडूंची पहिल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
Edited by: संदीप देसाई
Published on: February 28, 2024 10:37 AM
views 491  views

सावंतवाडी : आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर आपल्या गावातील संघाला अनेक विजय मिळवून देणारे, आतासारखी सुविधा, पैसा नसतानाही प्रतिकूल परिस्थितीत क्रिकेटमध्ये प्रतिथयश संपादन करणाऱ्या, त्याकाळी मैदान गाजवणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील ४० वर्षावरील खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावर खेळ दाखविण्याची संधी 'दोडामार्ग लिजंड्स' क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने दिली जात आहे. मार्च महिन्यात १७ व १८ ला या स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल साटेली भेडशी याठिकाणी आयोजित करण्यात आली असल्याचे माहिती या स्पर्धेच्या संयोजकांनी दिली आहे.

या दिग्गज ज्येष्ठ खेळाडूंना पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी ही स्पर्धा भरवण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या नियोजनाची बैठक नुकतीच साटेली भेडशी येथे संपन्न झाली. यावेळी जय भोसले, लवू खानोलकर, प्रमोद गवस, राकेश महाजन, अमित देसाई, बाबा मयेकर, निलेश तळणकर, प्रवीण गवस, महेंद्र करमळकर, कृष्णा नाईक, शाम नाईक, चंद्रा आयनोडकर, शाबी तुळसकर, विजय गवस, राजेश फुलारी, शानी बोर्डेकर यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.

यावेळी जय भोसले यांनी स्पर्धेच्या आयोजनाबाबत माहिती देत या स्पर्धेचा हेतू स्पष्ट केला. माजी जेष्ठ खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावर आणण्यासाठी, त्यांच्यातील क्रिकेटचा जलवा पुन्हा एकदा युवा पिढीने पहावा, यादृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती यावेळी संयोजकांनी दिली.

या स्पर्धेत जसे खेळाडू सहभागी होतील तसे संघ वाढवले जातील. सद्यस्थितीत १३० खेळाडूंनी नोंदणी केलेली आहे. त्यामुळे ८ संघ या स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज आहेत. आयपीएलच्या धर्तीवर ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सर्व सहभागी खेळाडूंना संपूर्ण क्रिकेटचा ड्रेस देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख २० हजार रुपये व आकर्षक भव्य चषक, उपविजेत्या संघाला रोख १० हजार रुपये व आकर्षक भव्य चषक तर उपांत्य फेरीतील पराभूत संघाना रोख पारितोषिक व चषक प्रदान करण्यात येणार आहे.तसेच प्रत्येक सामन्यात सामनावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज याबरोबरच मालिकावीर यांच्यासाठी रोख पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे.तसेच तालुक्यातील सहभागी सर्व लिजंड्स खेळाडूना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी जय भोसले ९३७०९२१७९३,लवू खानोलकर ९४२३३०२०७६,प्रमोद गवस ९३२६८९५३९४,निलेश तळणकर ९४२११४५३२४ ,राजेश फुलारी  यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केलं आहे.