सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील पत्रकारांना क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येवून एक दिवस आनंद लुटता यावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वप्रथम जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने ' पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा ' भरवण्याची संकल्पना सुरू करत ती यशस्वी केली. त्याच संकल्पनेनुसार मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर ३१ जानेवारी रोजी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील आठ तालुका आणि एक मुख्यालय असे एकूण नऊ क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत.
यासाठी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाची बुधवारी अध्यक्ष संदीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी यावेळी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. यावेळी सचिव लवू म्हाडेश्र्वर, खजिनदार गिरीश परब यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपकर, माजी जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, नंदकुमार आयरे, विनोद दळवी, विनोद परब, सतीश हरमलकर, दत्तप्रसाद वालावलकर, संजय वालावलकर, मनोज वारंग आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नंदकुमार आयरे, कसाल येथील शारदा ग्रंथालय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लवू म्हाडेश्र्वर तसेच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल बाळ खडपकर यांचा संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
पत्रकार हे नेहमी बातम्या शोधण्यात आणि त्या वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी व्यस्त असतात. या ताणामुळे त्यांना आपल्यातील स्पोर्टमनशीप जपता येत नाही. त्यामुळे या नेहमीच्या व्यापातून एक दिवस जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना एकत्रित करून त्यांना मैदानावर उतरण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुख्यालय पत्रकार संघाने बैठकीत घेतला आहे. यासाठी विजेत्या आणि उपविजेत्या संघाना आकर्षक बक्षीस तसेच आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व पत्रकार संघाना आकर्षक सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच अंतिम सामन्याचा सामनावीर, पूर्ण मालिकेचा मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज यांनाही आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील आठही तालुका पत्रकार संघानी आपला संघ सहभागी करून ही पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन मुख्यालय पत्रकार संघाच्या झालेल्या बैठकीत करण्यात आले आहे. मुख्यालय पत्रकार संघाने तिसऱ्या वर्षी अशाप्रकारे क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. पहिल्या दोन वर्षी मालवण तालुका पत्रकार संघाच्या टीमने या स्पर्धेच्या चषकावर आपले नाव कोरले आहे. आता तिसऱ्या स्पर्धेत यश मिळवून मालवण संघ हॅट्रिक साधतो की नवीन संघ मानकरी ठरतो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, सहभागी होणाऱ्या पत्रकारांचे यानिमित्त स्नेहाभोजन सुद्धा होणार असून त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.