टीम इंडियाचा विजयी षटकार

इंग्लंड चारीमुंड्या चीत, १०० धावांनी शानदार विजय
Edited by:
Published on: October 29, 2023 22:07 PM
views 137  views

भारत आणि इंग्लंड यांच्यातील विश्वचषकाच्या २९व्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजीपुढे संपूर्ण इंग्लंड संघ ढेपाळला. याविजयाने भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहचला असून गतविजेते हे बाहेर पडले आहेत. भारताने तब्बल १०० धावांनी इंग्लिश संघाचा पराभव केला.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील विश्वचषकाच्या २९व्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला चारीमुंड्या चीत करत २० वर्षाच्या पराभवाचा बदला घेतला. याविजयाने भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहचला असून गतविजेते हे बाहेर पडले आहेत. भारताने तब्बल १०० धावांनी इंग्लिश संघाचा पराभव केला. मुस्कारो आप लखनऊ मे हो! असे म्हणत भारतीय संघाने पाहुण्यांचा चांगलाच समाचार घेतला. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटूंनी इंग्लिश फलंदाजांची पळताभुई थोडी झाली. रोहित शर्माला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.


इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने इंग्लंडला २३० धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत नऊ विकेट्स गमावून २२९ धावा केल्या होत्या. भारतीय संघ असा एकमेव संघ आहे जो या विश्वचषकात आतापर्यंत ऑलआऊट झालेला नाही. भारतीय संघाची विजयी घौडदौड पुढे सुरूच आहे. भारताकडून रोहित शर्माने कर्णधारपदाची खेळी खेळली आणि ८७ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने ४९ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या

जसप्रीत बुमराहने ३५व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मार्क वुडला क्लीन बॉलिंग देऊन इंग्लंडचा डाव संपवला. वुडने केवळ एका चेंडूचा सामना केला आणि त्याला खातेही उघडता आले नाही. डेव्हिड विली १६ धावा केल्यानंतर दुसऱ्या टोकाला नाबाद राहिला. वुड आऊट होताच टीम इंडियाने मॅच जिंकली. त्यांनी इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला. या विजयासह भारताचे सहा सामन्यांतून १२ गुण झाले असून ते उपांत्य फेरी गाठण्याच्या जवळ आहे. दुसरीकडे इंग्लंडला सहा सामन्यांत पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले असून त्यांचे अवघे दोन गुण आहेत. २० वर्षांतील विश्वचषकात भारताचा इंग्लंडवर पहिला विजय असून टीम इंडियाने एकप्रकारे लगान वसूल केला आहे. त्यांचा शेवटचा विजय २००३ मध्ये होता. त्यानंतर २०११ मध्ये दोन्ही संघांमधील सामना बरोबरीत सुटला होता. त्याचवेळी २०१९ मध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

लखनऊच्या एकाना स्टेडियमवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने ५० षटकांत नऊ गडी गमावून २२९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव ३४.५ षटकांत १२९ धावांत गारद झाला. भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडच्या फलंदाजांना टिकू दिले नाही. न्यूझीलंडविरुद्ध पाच विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद शमीने या सामन्यातही अफलातून गोलंदाजी करत चार विकेट्स आपल्या नावावर केल्या. अनुभवी जसप्रीत बुमराहने तीन विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवला दोन आणि रवींद्र जडेजाला एक गडी बाद करत या दोघांना मदत केली.

भारतीय गोलंदाजांनी सातत्याने विकेट्स घेत इंग्लंडला दडपणाखाली ठेवले. जो रूट आणि बेन स्टोक्स या दिग्गजांशिवाय मार्क वुडलाही खाते उघडता आले नाही. इंग्लंडसाठी लियाम लिव्हिंगस्टोन हा एकमेव फलंदाज होता ज्याने २० धावांचा टप्पा ओलांडला. त्याने सर्वाधिक २७ धावा केल्या. डेव्हिड मलानने १६, डेव्हिड विलीने नाबाद १६, मोईन अलीने १५, जॉनी बेअरस्टोने १४, आदिल रशीदने १३, जोस बटलर आणि ख्रिस वोक्सने १०-१० धावा केल्या.