ब्युरो न्यूज - आशिया खंडातील सर्वात प्रतिष्ठेची क्रिकेट स्पर्धा म्हणजे आशिया कप 2025 .ही स्पर्धा येत्या 9 सप्टेंबरपासून रंगणार आहे. दुबई आणि अबू धाबी येथील मैदानांवर ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये पार पडणार असून 28 सप्टेंबरपर्यंत चाहत्यांना याचा थरार अनुभवायला मिळणार आहे. एकूण आठ संघ या स्पर्धेत सहभाग घेणार असून यंदाचा आशिया कप अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. मात्र त्यातील सर्वात मोठी चर्चा आहे ती म्हणजे भारतीय संघातील दोन दिग्गज खेळाडूंची अनुपस्थिती ! अर्थात विराट कोहली आणि रोहित शर्मा . भारतीय क्रिकेटचे गेल्या दोन दशकांतील आधारस्तंभ, यंदा आशिया कपमध्ये सहभागी होणार नाहीत. या दोघांनीही 2024 मध्ये भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे 2025 मधील स्पर्धेसाठी त्यांची निवड होणे शक्यच नव्हते. पण या बातमीचं खास वैशिष्ट्य हे आहे की, 2004 नंतर पहिल्यांदाच भारटाचा संघ आशिया कपमध्ये या दोघांशिवाय उतरणार आहे
२००८ पासून जवळपास प्रत्येक आशिया कपमध्ये या दोघांपैकी किमान एक खेळाडू भारतीय संघात सहभागी होता. २००८, २०१०, २०१२, २०१४, २०१६, २०१८, २०२२ आणि २०२३ अशा सातही स्पर्धांमध्ये रोहित आणि विराट यांनी भारतीय संघाला बळकटी दिली होती. विशेष म्हणजे २०१८ साली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया कप जिंकला होता, आणि २०२३ मध्येही भारताने आशिया विजेतेपद पटकावलं.विराट कोहलीने कर्णधार आणि फलंदाज म्हणून अनेक विक्रम केले, तर रोहित शर्माने भारताला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपासून ते टी-20 वर्ल्ड कपपर्यंत महत्त्वाचे किताब मिळवून दिले आहेत . मात्र यंदाच्या आशिया कपमध्ये त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवणार, हे नक्कीच.
ही स्पर्धा केवळ चुरशीचीच नव्हे, तर बदलांचीही ठरणार आहे. नव्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार असून तरुण खेळाडूंना चमकण्याची संधी मिळणार आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर, 21 वर्षांनंतर विराट-रोहितशिवाय होणारी आशिया कप स्पर्धा हेच सर्वात मोठं आकर्षण ठरणार आहे.