भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा दुसरा वनडे सामना रांची येथे खेळला गेला. अखेरचा षटकात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीनंतर श्रेयस अय्यर व इशान किशन यांनी जबरदस्त फलंदाजी करत भारताचा विजय सुकर केला. भारताने 7 गडी राखून हा सामना जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. अय्यरचे नाबाद शतक व किशनच्या आक्रमक 93 धावा भारतीय विजयाचे वैशिष्ट्य राहिले.
दक्षिण आफ्रिकेचे या सामन्यात नेतृत्व करणाऱ्या केशव महाराज याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अनुभवी क्विंटन डी कॉक हा या सामन्यात अपयशी ठरला. मलानही 25 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. मात्र, त्यानंतर रिझा हेन्रिंक्स व अनुभवी ऐडन मार्करम यांनी शतकी भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला सामन्यात पुनरागमन करून दिले. दोघांनी अनुक्रमे 74 व 79 धावा केल्या. मागील सामन्यात चमकलेल्या क्लासेनने 30 तर डेव्हिड मिलरने नाबाद 35 धावा केल्या. भारतासाठी मोहम्मद सिराजने सर्वाधिक 3 बळी टिपले.
2ND ODI. India Won by 7 Wicket(s) https://t.co/w3junq8VVt #INDvSA @mastercardindia
— BCCI (@BCCI) October 9, 2022
विजयासाठी मिळालेल्या 279 धावांचा पाठलाग करताना भारताला पहिले दोन धक्के लवकर बसले. कर्णधार शिखर धवन 13 व शुबमन गिल 28 धावा करून बाद झाले. तिसऱ्या गड्यासाठी इशान किशनने श्रेयस अय्यरसोबत 161 धावांची भागीदारी केली. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या इशानने 93 धावांची तुफानी खेळी केली. तो आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण करू शकला नाही. मात्र, श्रेयस आयरने ही संधी साधली. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 113 धावा केल्या. त्याला संजू सॅमसने 30 धावा काढत साथ दिली. अय्यर यालाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतील अखेरचा व निर्णायक सामना दिल्ली येथे मंगळवारी (11 ऑक्टोबर) खेळला जाईल.