चट्टोग्राम : बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे खेळला गेला. या सामन्याचा रविवारी (१८ डिसेंबर) शेवटचा दिवस होता, ज्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत यजमान संघाला पराभवाचा धक्का दिला. हा सामना भारताने १८८ धावांनी जिंकत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. यावेळी बांगलादेशच्या दुसऱ्या डावात भारताकडून अक्षर पटेल, कुलदीप यादव यांनी उल्लेखनीय प्रदर्शन केले. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
बांगलादेशचा दुसरा डाव ३२४ धावांवर आटोपला. अक्षर पटेलने तैजुल इस्लामला त्रिफळाचीत करून बांगलादेशचा डाव संपवला. यासह भारताने हा सामना १८८ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला आहे. बांगलादेशातील धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक होते आणि या विजयासह भारताने कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीकडे एक पाऊल टाकले आहे. आता भारताला उरलेल्या पाचपैकी चार कसोटी जिंकायच्या आहेत.
सामन्यात काय झालं?
नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात ४०४ धावा केल्या. पुजारा ९०, श्रेयस अय्यर ८६ आणि रविचंद्रन अश्विन ५८ धावा करून बाद झाले. पंत आणि कुलदीपनेही चांगले योगदान दिले. बांगलादेशकडून तैजुल इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी चार बळी घेतले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ केवळ १५० धावा करू शकला. मुशफिकुर रहीमने सर्वाधिक २८ आणि मेहदी हसनने २५ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने पाच आणि मोहम्मद सिराजने तीन बळी घेतले.
शुभमन गिलच्या ११० आणि चेतेश्वर पुजाराच्या १०२ धावांच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात २ बाद २५८ धावा केल्या. पुजाराच्या शतकासह कर्णधार राहुलने डाव घोषित केला. दुसऱ्या डावात बांगलादेशच्या खालेद अहमद आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. भारताने आपला दुसरा डाव ५१२ धावांवर घोषित केला आणि बांगलादेशसमोर विजयासाठी ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले.
प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ केवळ ३२४ धावा करू शकला आणि १८८ धावांच्या फरकाने सामना गमावला. बांगलादेशकडून झाकीर हसनने शतक, शाकिबने ८४ आणि शांतोने ६७ धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने चार आणि कुलदीप यादवने तीन बळी घेतले. इतर सर्व गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. या विजयाने भारताच्या आयसीसी कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा आशा वाढल्या आहेत.