वेंगुर्ला : तळवडे येथील उद्दीन्नाथ कला क्रीडा मंडळ, परबवाडी आयोजित कै. प्रकाश परब स्मृती टेनिस बॉल एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धेत प्रसिद्ध उद्योजक राजाराम गावडे यांच्या मालकीच्या राजाराम वॉरियर्स तळवडे संघाने अन्वि रेडी संघावर सात गड्यांनी विजय मिळवत या स्पर्धेचे महाविजेतेपद पटकावले व चषकावर दिमाखात आपले नाव कोरले.
या स्पर्धेत अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना राजाराम वॉरियर्स संघाने तेजस पडवळ, प्रवीण कुबल यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रेडी संघाला सहा षटकात केवळ ५२ धावांवर रोखले. यानंतर फलंदाजी करताना लतेश साळगावकर च्या तुफानी ३० धावांच्या जोरावर तळवडे संघाने पाच षटकात हे आव्हान सहजरीत्या पूर्ण केले व स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून तेजस पडवळ, सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून सिद्धेश कांबळी आणि स्पर्धेतील मालिकावीर म्हणून ग्लेन फर्नांडिस यांना गौरविण्यात आले.