न्यूयॉर्क : टी-२० विश्वचषकात धक्कादायक निकालांची परंपरा कायम आहे. दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेने पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये गारद केल्यानंतर, आज अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा अवघ्या ७५ धावांत खुर्दा करत आपल्या गटात २ विजयांसह अव्वल स्थान पटकावले आहे. दरम्यान या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय त्यांच्या अंगलट आला.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तान संघाने २० षटकांत १५९ धावांपर्यंत मजल गाठली. त्यानंतर १६० धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडचा संघाचा केवळ ७५ धावांत खुर्दा झाला. राशिद खानने या सामन्यात एकूण ४ विकेट घेतल्या. अफगाणिस्तानतर्फे सलामीला आलेल्या रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी शानदार खेळी केली. गुरबाजने ५६ चेंडूत ८० धावा चोपडल्या. यादरम्यान त्याने ५ चौकार आणि ५ षटकार वसूल केले. तर झाद्रानने एका बाजूने नांगर टाकत ४१ चेंडूत ४४ धावांची संयमी खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजमतुल्लाने १३ चेंडूत २२ धावांची खेळी केली. याशिवाय एकाही खेळाडूला दोन अंकी धावा करता आल्या नाहीत.
अफगाणिस्तानने २० षटकांत १५९ धावा केल्या. न्यूझीलंडच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर ट्रेंट बोल्टने २ बळी घेतले. याशिवाय मॅट हेन्रीनेही २ बळी घेतले. लॉकी फर्ग्युसनला मोहम्मद नबीच्या रूपाने १ बळी मिळाला. न्यूझीलंडतर्फे सलामीला आलेले फिन ऍलन आणि डेव्हन कॉनवे अनुक्रमे ० आणि ८ धावा करून बाद झाले. तिसऱ्या क्रमांकावर आलेला कर्णधार केन विल्यमसनही ९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
याशिवाय डॅरिल मिशेलने ५ धावा, ग्लेन फिलिप्सने १८ धावा आणि मार्क चॅपमनने ४ धावा केल्या. राशीद खानने विणलेल्या फिरकीच्या जाळ्यात न्यूजीलंड अशाप्रकारे अडकला की शेवटपर्यंत सावरलाच नाही. त्याने ४ बळी घेत न्यूझीलंडच्या मध्यफळीला खिंडार पाडले. उरलेली मोहीम अफगाणिस्तानच्या इतर गोलंदाजांनी फत्ते केली. न्यूझीलंडचा संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही आणि ७५ धावांवर गारद झाला.