रुद्र सुलोकारची जलतरण प्रशिक्षणासाठी पुणेच्या क्रिडा प्रबोधिनीमध्ये निवड

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 08, 2024 13:57 PM
views 167  views

सिंधुदुर्गनगरी : ओरोस येथील डॉन बॉस्को स्कुल मध्ये सातवी मध्ये शिकणारा सिंधुदुर्गनगरी येथील रुद्र प्रवीण सुलोकार याची पुणे बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनी मध्ये जलतरण प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

     सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलावामध्ये रुद्र पाच वर्षाचा असल्यापासून जलतरणचे प्रशिक्षक असलेले त्याचेच वडील  प्रवीण सुलोकार यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणचा सराव करत आहे त्याने आता पर्यत जिल्हा, विभाग व राज्य स्तरावरील अनेक स्पर्धामध्ये भाग घेत यश मिळविलेले आहे. त्याने सागरी मॅरेथॉन मधेही सहभाग घेत यश मिळविलेले आहे. त्यानंतर आता त्याची क्रीडा प्रबोधिनी मध्ये निवड झाली आहे. 

    राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचनालया मार्फत पुणे बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनी मध्ये प्रशिक्षणसाठी निवड करण्यासाठी प्रथम  सांगली येथे विभागीय निवड चाचणी घेण्यात आली. त्यात उत्तीर्ण झाल्यावर पुणे येथे राज्यस्तरीय निवड चाचणी घेण्यात आली त्यानंतर त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रुद्र सुलोकार याची निवड झाली आहे. दोन दिवसापूर्वीच तो प्रशिक्षणासाठी पुणे क्रीडा प्रबोधिनी मध्ये दाखल झाला आहे. तेथील राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणचे प्रशिक्षण घेणार आहे. 

   क्रीडा प्रबोधिनी मध्ये झालेल्या रुद्रच्या निवडी बद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस तसेच डॉन बॉस्को स्कुलचे प्रचार्य, क्रीडा शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून यापूर्वी सिंधुदुर्गनगरी येथिल पूर्वा संदीप गावडे हिची क्रीडा प्रबोधिनीमध्ये निवड झाली होती. ती सद्या क्रीडा प्रबोधिनी मधेच प्रशिक्षण घेत असून जलतरण मध्ये तीने राष्ट्रीय स्तरा पर्यत मजल मारली आहे.