आशिया चषकातील भारताचा दुसरा सामना... दुबईचे स्टेडिअम अन् .. भारतापुढे होता हाँगकाँग सारखा दुबळा संघ. त्यामुळे भारतीय फलंदाज हाँगकाँगचा खुर्दा उडवतील असे वाटत होते. पण सुरूवातीच्या काही षटकांत हाँगकाँगच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवले. त्यामुळे वेगवान धावा करण्याच्या नादात कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 21 धावांवर बाद झाला. दुसऱ्या टोकाला के एल राहुल टेस्ट मॅच खेळत असल्याचे चित्र होते. त्याच्या बॅटवर एकही चेंडू बरोबर येत नव्हता. दुसरीकडे, विराट कोहली आपला हरवलेला फॉर्म शोधण्याच्या प्रयत्नांत होता. त्यामुळे तो मोठे शॉट्स खेळताना घाबरत असल्याचे दिसून येत होते.
के एल राहुल 39 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. त्याचा स्ट्राइक रेट केवळ 92.30 होता. तो बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या सूर्यकुमार यादव उतरला. त्याने हाँगकाँगच्या गोलंदाजाची अक्षरशः पिसे काढून दुबईच्या पिचवर कशी फलंदाजी करावी हे दाखवून दिले.
डिव्हिलियर्स आणि धोनीची आठवण झाली
सूर्यापुढे हाँगकाँगचे सर्वच गोलंदाज फिके पडले. त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्स व महेंद्र सिंह धोनीची आठवण ताजी झाली. सूर्याने आपल्या डावात डिव्हिलियर्सचे 360 डिग्री शॉट्स व धोनीच्या हेलिकॉप्टर शॉट्सचे दर्शन घडवले.
भारतीय डावाचे 16 वे षटक सुरू होते. यावेळी हाँगकाँगचा गोलंदाज एजाज खानची गोलंदाजी होती आणि त्याचा ओव्हरमधील चौथा चेंडू होता. इजाजने सुर्याच्या ऑफ साइडच्या बाहेर चेंडू टाकला. सूर्यकुमारने एक पाऊल पुढे टाकत डिव्हिलियर्सच्या शैलीत झुकून चेंडू टालोवला आणि पाहता पाहता तो चेंडू यष्टीरक्षकाच्या वरून सीमारेषेबाहेर गेला. सुर्य़ाचा हा फटका पाहून एजाजसह संपूर्ण हाँगकाँग टीम त्या चेंडूकडे बघतच राहीली. यावेळी समालोचन करणाऱ्या माजी खेळाडूंनी तर सूर्याला भारताचा डिव्हिलियर्स म्हणून त्याचा उल्लेख केला.
आयुष शुक्ला भारतीय डावातील 18 वे षटक टाकण्यासाठी आला आणि त्याच्या चौथ्या चेंडूवर सूर्याने धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट लगावला. हा चेंडू बाउंड्रीबाहेर गेला. या ओव्हरमध्ये सूर्याने 15 धावा काढल्या.
इनिंगच्या ब्रेकमध्ये जेव्हा त्याला या शॉटबद्दल विचारले असता, त्याने सांगीतले, 'मी या सर्व शॉट्सचा सराव केला नव्हता. लहानपणी मी माझ्या मित्रांसोबत मैदानावर रबराच्या चेंडूनेच जास्त क्रिकेट खेळायचो. त्यामुळे हे शॉटस माझ्यामध्ये तेव्हापासून आहेत फरक एवढाच की ते शॉटस मी आज खेळलो.
ज्यावेळी मी पंत आणि रोहितसह डग-आऊटमध्ये बसलो होतो त्यावेळी त्यांना मी हेच सांगीतले की एकदा मी मैदानावर सेट झाल्यानंतर माझ्या मनासारखे सर्व शॉटस खेळणार आणि स्कोअर 170 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करेन.
सूर्यकुमारच्या या शानदार खेळीनंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने त्याच्या खेळाला दाद देण्यासाठी म्हणून त्याला सलाम केला. विराटच्या या कृतीतून आपल्याला विराटची खेळाडू वृत्तीच दिसून येते.
विराट कोहलीच्या साथीने सूर्यकुमार यादवने शेवटच्या 3 षटकात 54 धावा काढल्या. यामध्ये सूर्याने तडाखेबंद फलंदाजी करत 41 धावा काढल्या. डावाच्या शेवटच्या षटकात त्याने 4 षटकार ठोकले.
20 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या हारून अर्शदच्या चेंडूवर त्याने एकूण 26 धावा काढल्या. पहिल्या तीन चेंडूंमध्ये सलग तीन षटकार खेचले आणि चौथा चेंडू हारूनने डॉट टाकला, त्यानंतर पुन्हा सुर्याने पाचव्या चेंडूवर षटकार खेचले.