श्रीलंकेचा संघ अवघ्या ५० धावांवर ऑल आऊट

मोहम्मद सिराजचा भेदक मारा
Edited by: ब्युरो
Published on: September 17, 2023 17:42 PM
views 114  views

कोलंबो: आशिया चषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय श्रीलंकेसाठी अजिबातच चांगला राहिला नाही. पॉवरप्लेमध्येच श्रीलंकेचा अर्धा अधिक संघ तंबूत होता. भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या तालावर अक्षरशः श्रीलंकेचा संघ नाचताना दिसला. फायनलसारख्या सामन्यात श्रीलंकेचा डिफेंडिंग चॅम्पियन संघ अवघ्या ५० धावा करून ऑल आऊट झाला. श्रीलंकेसाठी ही सर्वात कमी धावसंख्या आहे.

आशिया चषक २०२३ च्या फायनलमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांची कामगिरी पाहून संपूर्ण जग थक्क झालं आहे. कोलंबोमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा डाव अवघ्या १५.२ षटकांत ५० धावांत गुंडाळला. अवघ्या २१ धावांत ६ विकेट घेणाऱ्या मोहम्मद सिराजने श्रीलंकेचे पार कंबरडे मोडले. त्यांच्याशिवाय हार्दिक पांड्याने ३ आणि जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली. भारतीय गोलंदाजांनी असा कहर केला की, श्रीलंकेचा निम्मा संघ खातेही उघडू शकला नाही. श्रीलंकेचे पाच फलंदाज तर शून्यावर बाद झाले.

श्रीलंकेच्या केवळ २ फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. कुसल मेंडिसने सर्वाधिक १७ धावा केल्या. दुशान हेमंताने १३ धावांचे योगदान दिले. एकंदरीत श्रीलंकेचा संघ मोहम्मद सिराजसमोर गुडघे टेकतांना दिसला. सिराजच्या गोलंदाजीला त्यांच्याकडे उत्तर नव्हते आणि ते मैदानात येऊन थेट पॅव्हेलियनमध्ये जात होते. मोठी गोष्ट म्हणजे श्रीलंकेच्या सर्व १० विकेट भारतीय वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. यासह भारतीय संघाला आशिया चषक २०२३ चे जेतेपद पटकावण्यासाठी अवघ्या ५१ धावांचे आव्हान आहे.

एकदिवसीय फायनलमधील श्रीलंकेची सर्वात कमी धावसंख्या.

सिराजच्या घातक गोलंदाजीमुळे श्रीलंकेच्या नावावर अनेक नकोसे विक्रम नोंदवले गेले. श्रीलंकेने १२ धावांमध्ये ६ विकेट गमावल्या आणि यासह वनडे फायनलमध्ये सर्वात कमी धावांमध्ये पाच विकेट गमावण्याचा दुसरा सर्वात वाईट स्कोअर बनवला. योगायोगाने हा विक्रमही श्रीलंकेच्या नावावर आहे, ज्याने २००९ मध्ये मीरपूरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या वनडे अंतिम सामन्यात ५ धावांत ६ विकेट्स गमावल्या होत्या.'