श्रीलंकेने पटकावले विश्वचषक पात्रता फेरीचे विजेतेपद

अंतिम फेरीत नेदरलँड्सचा १२८ धावांनी उडवला धुव्वा
Edited by: ब्युरो
Published on: July 10, 2023 16:06 PM
views 214  views

श्रीलंका आणि नेदरलँड्स क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेल. झिम्बाब्वेतील हरारे येथे रविवारी (९ जुलै) झालेल्या सामन्यात श्रीलंकेने नेदरलँड्सचा १२८ धावांनी पराभव केला. या सामन्याचा विश्वचषकातील स्थानांवर कोणताही परिणाम झालेला नाही. श्रीलंका आणि नेदरलँड्सने सुपर सिक्समध्ये अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवून आगामी विश्वचषकात आधीच आपले स्थान निश्चित केले होते.

या स्पर्धेत १० संघांनी सहभाग घेतला. अमेरिका, नेपाळ, आयर्लंड आणि संयुक्त अरब अमिरातीचे संघ गट फेरीतून बाहेर पडले. यानंतर सुपरसिक्समध्ये चार संघांना बाहेरचा रस्ता पकडावा लागला. दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिज व्यतिरिक्त झिम्बाब्वे, स्कॉटलंड आणि ओमानचे संघ विश्वचषकासाठी पात्र ठरू शकले नाहीत. १९७५ आणि १९७९ मध्ये स्पर्धा जिंकणारा वेस्ट इंडिज संघ प्रथमच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळताना दिसणार नाही.

नेदरलँड्सने श्रीलंकेला २३३ धावांत गुंडाळले –

या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर त्यांच्या संघाने श्रीलंकेला ४७.५ षटकांत २३३ धावांत गुंडाळले. लंकन संघाकडून सहान आर्चिगेने ५७ धावा केल्या. चरित अस्लंकाने ३६, कुशल मेंडिन्सने ४३, वानिंदू हसरंगाने २९ आणि पाथुम निसांकाने २३ धावांचे योगदान दिले. सदीरा समरविक्रमाने १९ आणि महिष तीक्षानाने १३ धावा केल्या.

दासुन शनाका फलंदाजीत अपयशी ठरला –

धनंजय डिसिल्वा आणि मथिशा पाथिराना यांना प्रत्येकी केवळ चार धावा करता आल्या. त्याचवेळी कर्णधार दासुन शनाकाची बॅटही चालली नाही. त्याला केवळ एक धाव करता आली. नेदरलँडकडून व्हॅन बीक, रायन क्लेन, विक्रमजीत सिंग आणि साकिब झुल्फिकार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. आर्यन दत्तने एक विकेट घेतली.

श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी केली शानदार गोलंदाजी –

२३४ धावांचे लक्ष्य पाहता नेदरलँडचा संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, मात्र लंकन गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. श्रीलंकेच्या फिरकीपटूंपुढे नेदरलँडच्या फलंदाजाकडे उत्तर नव्हते. संपूर्ण संघ १०५ धावांवर गारद झाला. नेदरलँडकडून मॅक्स ओडाडने ३३, लोगन व्हॅन बीकने २० आणि विक्रमजीत सिंगने १३ धावा केल्या. या तिघांशिवाय दहाच्या आकड्याला कोणीही स्पर्श करू शकले नाही. महिष तीक्षानाने चार, दिलशान मदुशंकाने तीन आणि वनिंदू हसरंगाने दोन विकेट्स घेतल्या.