सिंधुदुर्ग : ५६ व्या उप-कनिष्ठ व कनिष्ठ महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सिंधुदुर्गच्या सहा कॅरमपटूनी महाराष्ट्राच्या संघात स्थान पटकावले. यातील ४ खेळाडू दि. १ ते ४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत दादर, मुंबई येथे होणाऱ्या ४७ व्या कनिष्ठ गट राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या खेळाडूंमध्ये १८ वर्षांखालील मुलींच्या गटात केशर निर्गुण, दिक्षा चव्हाण, मयुरी गावडे व प्रणिता आयरे सहभागी होतील. तर वाराणसी येथे होणाऱ्या १४ वर्षांखालील मुलींच्या गटात पूर्वा केतकर, देवगड व १४ वर्षाखालील मुलांच्या गटात अमूल्य घाडी, सावंतवाडी यांचा समावेश आहे.
मुंबई दादर येथे दि. ११ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या ५६ व्या उप-कनिष्ठ व कनिष्ठ महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनचा १९ जणांचा संघ सहभागी झाला होता. १८ वर्षाखालील मुलींच्या गटात सावंतवाडीची राष्ट्रीय कॅरमपटू केशर निर्गुण हिने स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अंतिम फेरीत सिंधुदुर्गच्याच दिक्षा चव्हाण हिच्यावर विजय मिळवून विजेतेपद पटकाविले. कॅरमच्या राज्य स्पर्धेत अंतिम सामन्यात दोनही खेळाडू सिंधुदुर्गचे अशी घटना इतिहासात पहिल्यांदाच घडली. मयुरी गावडे हिनेही आपल्या दुसर्या राज्य स्पर्धेत खेळताना सातवा क्रमांक पटकावला. तर प्रणिता आयरे हिला अकराव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. १४ वर्षाखालील मुलांच्या गटात सावंतवाडीच्या अमूल्य घाडी याने चौथा क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग निश्चित केला व १४ वर्षांखालील मुलींच्या गटात पहिलीच राज्य स्पर्धा खेळणाऱ्या पूर्वा केतकरने थेट उपान्य फेरीत धडक मारली. पण तिला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव यतीन ठाकूर व सर्व पदाधिकारी, ऑल इंडिया कॅरम फेडरेशन चे खजिनदार व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष अरुण केदार, अजित सावंत, योगेश फणसलकर यांच्या उपस्थितीत पार पडला.