मुंबई ः गेली २ वर्षे कोविडमुळे न झालेली जागतिक दर्जाची टाटा मुंबई मॅरेथॉन यावर्षी१५ जानेवारीला मोठ्या दिमाखात पार पडली. जगभरात पाच महत्वाच्या मॅरेथॉन आयोजन करणाऱ्या टाटा ग्रुपची मुंबई मॅरेथॉन म्हणजे रनरचा कुंभमेळा मानला जातो. त्याचा प्रत्यय म्हणजे यावर्षी ५५,२१२ रनर टाटा मॅरेथॉन धावले. त्यांना सहायक म्हणून जवळपास ३००० पोलीस, ४५० वैद्यकीय टीम असा फौजफाटा तैनात होता.
यावर्षी सिंधुरनर टीमकडून ११ धावक ४२.२ किलोमीटर अंतर धावण्यासाठी सामील झाले होते. जागतिक दर्जाच्या या मॅरेथॉनमध्ये प्रत्येकाचा कल हा आपला उत्कृष्ट्र वेळ नोंदवण्याचा असतो. याचे कारण म्हणजे मुंबई मॅरेथॉनचा मार्ग हा आझाद मैदान, छत्रपती शिवाजी टर्मिनलकडून सुरू होऊन वरळी सीफेस, वांद्रे वरळी सीलिंक, माहीम, परत वांद्रे, प्रभादेवी, दादरकडून वानखेडे स्टेडियमकडून छत्रपती शिवाजी टर्मिनल असा जवळपास सपाट आहे. म्हणून प्रत्येक रनर आपला उत्कृष्ट्र वेळ नोंदवण्याचा प्रयत्न करतो.
या मॅरेथॉनमध्ये पण सिंधुरनर टीमची कामगिरी वाखणण्याजोगी राहिली. कोकण एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांडुरंग कदमने तब्बल ३ तास २० मिनिटात ही रन पूर्ण केली. नरेश मांडावकरने ३ तास २९ मिनिटात, बाळकृष्ण सप्रे यांनी ३ तास ५६ मिनिटांत, ओंकार पराडकरने ४ तास ३ मिनिटात, डॉ. स्नेहल गोवेकर यांनी ४ तास १२ मिनिटात, मिलिंद बागवे (वय ६३) यांनी ४ तास १४ मिनिटात, नितीन मळीक यांनी ४ तास २१ मिनिटात, भूषण बांदेलकर याने ५ तास १५ मिनिटात, विभावरी सप्रे हिने ५ तास २५ मिनिटात, रोहित कोरगावकरने ५ तास ३० मिनिटात, संतोष पेडणेकर यांनी ५ तास ४८ मिनिटांत, निलेश मळीक याने ६ तास ५४ मिनिटात ही रन पूर्ण केली. तसेच सुप्रिया मोडक यांनी २ तास ४० मिनिटात २१ किलोमीटरचीअर्धमॅरेथॉन पूर्ण केली.
या कामगिरीबद्दल या सर्व टीममेंबर्सचे कौतुकहोत आहे. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर, डॉ. शंतनू तेंडुलकर, डॉ. अभिजीत वझे, डॉ. मिलिंद खानोलकर, डॉक्टर्स असोसिएशन ऑफ सावंतवाडी तसेच सावंतवाडी रिक्षा चालक मालक संघटना, दैनिक कोकणसाद, सर्व पत्रकार बंधू आणि डॉ. बाबासाहेब पाटील (आयुर्वेद महाविद्यालय, सावंतवाडीचे प्राचार्य), प्रसिद्ध कबड्डी प्रशिक्षक जावेद शेख, पखवाज अलंकार महेश सावंत आणि दादा परब, नेमबाजी प्रशिक्षक कांचन उपरकर अशा सर्व मान्यवरांकडून सिंधुरनर टीमचे कौतुक होत आहे. अशीच कामगिरी सिंधुरनर टीम बजावत राहील यात किंचित मात्र शंका नाही. सिंधुदुर्गात नवनवीन धावक तयार होऊन त्यांना नवीन व्यासपीठ मिळावे, यासाठी सिंधुरनर्स टीम प्रयत्न करीत आहे.