सिंधुदुर्गची जलकन्या पूर्वा गावडेची भारतीय संघात निवड

सिंगापूरमध्ये होणाऱ्या स्पर्धेत भारताचे करणार प्रतिनिधीत्व
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 26, 2025 14:42 PM
views 156  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गची जलकन्या राष्ट्रीय जलतरणपटू पूर्वा संदीप गावडे हिची सिंगापूर येथे होणाऱ्या जागतिक सागरी जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. दिव- दमन येथे झालेल्या खेलो इंडिया सागरी जलतरण स्पर्धेत दोन पदके मिळवत महाराष्ट्राचा झेंडा फडकवला होता या घवघवीत यशानंतर जागतिक सागरी जलतरण स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. 

सिंधुदुर्गनगरी येथील पूर्वा गावडे सध्या पुणे बालेवाडी येथे प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणचे प्रशिक्षण घेत असून शिक्षणही त्याच ठिकाणी घेत आहे. नुकतीच ती बारावी उत्तीर्ण झाली. तीने जलतरण स्पर्धेमध्ये कायम सातत्य ठेवत आतापर्यंत तिने राज्यस्तर व तसेच ओरिसा,अहमदाबाद, चेन्नई, गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत दमदार कामगिरी करत अनेक मेडल मिळविली आहेत. या कामगिरीच्या जोरावरच तिची दिव - दमन येथे झालेल्या खेलो इंडिया मध्ये सागरी जलतरण स्पर्धेत निवड झाली या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत दोन मेडल पटकावली होती. 

खेलो इंडिया स्पर्धेतील यशानंतर जागतिक सागरी जलतरण स्पर्धेसाठी बेंगलोर येथे निवड चाचणी घेण्यात आली त्यातही तीने यश मिळविल्यानंतर पूर्वाची सिंगापूर येथे 13 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या 5 किलोमीटरच्या जागतिक जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे खेलो इंडिया मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केल्यानंतर आता ती भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

पूर्वाने आतापर्यत राष्ट्रीय पातळीवर मिळविलेल्या यशात राष्ट्रीय जलतरण संघटनेचे सेक्रेटरी राजू पालकर व  पुणे येथील राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले आहे.