
भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील दुसऱ्या सामन्यानंतर आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. यावेळी अनेक महत्त्वाचे आणि मोठे बदल दिसून येत आहेत. मोठी गोष्ट म्हणजे इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने आपले पहिले स्थान गमावले आहे. दरम्यान, भारताचा नवीन कसोटी कर्णधार शुबमन गिलने खूप मोठी झेप घेतली आहे. तो आता सहाव्या क्रमांकावर आला आहे.
भारतीय संघाचा कसोटी कर्णधार शुबमन गिलने आपली सर्वोत्तम रँकिंग गाठली आहे. तो थेट 15 स्थानांची झेप घेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्याकडे 807 रेटिंग गुण आहेत. गिलने एजबेस्टन कसोटीत भारताच्या ऐतिहासिक 336 धावांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने पहिल्या डावात 269 धावा आणि दुसऱ्या डावात 161 धावांची शतकी खेळी खेळली. गिल आता नंबर-1 असलेल्या ब्रूकपेक्षा केवळ 79 गुणांनी मागे आहे.
गिलच्या पुढे रँकिंगमध्ये जो रूट (868 गुण), न्यूझीलंडचा केन विल्यमसन (867 गुण), भारताचा यशस्वी जयसवाल (858 गुण) आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (807 गुण) हे आहेत. यामुळे टॉप-10 मध्ये दोन भारतीय फलंदाजांचा समावेश झाला आहे. यशस्वी जयसवाल चौथ्या, तर रिषभ पंत (790 गुण) संयुक्तपणे सातव्या स्थानावर आहे.
इंग्लंडचा यष्टीरक्षक जेमी स्मिथनेही झेप घेतली असून भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीत नाबाद 184 आणि 88 धावांची खेळी करत त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग गाठली आहे. तो आता थेट 16 स्थानांची उडी मारत 10व्या क्रमांकावर पोहोचला आहे.