
सिंधुदुर्ग : राज्य शासनाच्यावतीने क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचा वितरण सोहळा पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा संकुलात पार पडला. यात सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील सरगवे गावचा सुपुत्र अजय अनंत सावंत यांना अश्वारोहण या क्रीडाप्रकारातील चमकदार कामगिरीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या सर्व खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी अभिनंदन केले. दोडामार्ग तालुक्यातील सरगवे गावचा सुपुत्र अजय अनंत सावंत यांना अश्वारोहण या क्रीडाप्रकारातील कामगिरीबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाने दोडामार्गसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचा लौकीक आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचवावा असे आवाहन राज्यातील सर्व खेळाडूंना करतानाच राज्यातील जे खेळाडू ऑलिंपिकपर्यंत मजल मारतील त्यांना शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही याप्रसंगी दिली. महाराष्ट्र खेळांना प्रोत्साहन देणारं देशातील अग्रेसर राज्य आहे. खेळाडुंना खेळासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी पदकविजेत्या खेळाडुंना प्रत्येकी पाच लाख आणि तीन लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा यावेळी केली.
तसेच प्रत्येक क्रीडाप्रेमींची इच्छा म्हणून देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या स्वर्गीय खाशाबा जाधव यांचा १५ जानेवारी हा जन्मदिन या राज्यात क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणा याप्रसंगी केली.
या सोहळ्यासाठी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, क्रीडा व युवक सेवा आयुक्त डॉ. सुहास दिवसे आणि राज्यभरातून आलेले खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.