सावंतवाडी : सावंतवाडीची राष्ट्रीय कॅरम खेळाडू केशर निर्गुण हिची वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली. राष्ट्रीय कॅरम खेळाडू केशर निर्गुण हिची 6 एप्रिल 2024 ते 10 एप्रिल 2024 या कालावधीत ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथे होणाऱ्या 51 व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम चॅम्पियनशिप 2023-24 या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या सहा जणांच्या महिला संघात निवड झाली आहे.
2015 सालापासून वयाच्या दहाव्या वर्षांपासून कॅरम खेळत असताना आतापर्यंत 2 सब ज्युनियर, 3 ज्युनियर, 3 वरिष्ठ राष्ट्रीय,1 फेडरेशन कप कॅरम स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संपातून सहभागी झाली असून 2 वेळा सांघिक विजेतेपद, 3 वेळा उपविजेतेपद, 2 वेळा तृतीय क्रमांक, 1 वेळा वैयक्तिक तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे. महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला कॅरम संघात सलग तिसऱ्या वेळी निवड होणारी सिंधुदुर्गातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे राज्यात घेण्यात आलेल्या वरिष्ठ राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत सहभाग घेऊन एक विजेतेपद, चार उपविजेतेपद प्राप्त करून यश संपादन केले आहे.सिंधुदुर्ग कॅरम असोसिएशन व कॅरम खेळाडू व कॅरम प्रेमी कडून तिला ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.