
सावंतवाडी : नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत आंबोली केंद्रातील आंबोली नांगरतास, आंबोली मुळवंद व गेळे–बाळेभाटले शाळांच्या एकत्रित संघाने कबड्डी (लहान गट – मुली) या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांच्या वतीने सर्व खेळाडूंचा व संबंधित शाळांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी “अधिक उंच, अधिक जलद, अधिक गतिमान” या ब्रीदवाक्याखाली शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. केंद्र, प्रभाग, तालुका व जिल्हा अशा विविध स्तरांवर या स्पर्धा घेतल्या जातात. यंदा आंबोली केंद्रातील नांगरतास, गेळे–बाळेभाटले व मुळवंदवाडी या तीन शाळांनी मिळून तयार केलेल्या संघाने प्रथम प्रभागस्तरावर अव्वल क्रमांक मिळवला, तर तालुकास्तरावरही उत्कृष्ट खेळ दाखवत प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला.
या संघातील प्रणाली जंगले, प्रणावी प्रदीप जंगले, सुजाता यमकर, तनुषा आवटे, श्रेया गुडूळकर, पूजा खरात, राजनंदिनी शिंदे, आन्वी हिरेमठ, रुंजी सावंत व ईश्वरी सावंत या विद्यार्थिनींचा अभिनंदनपत्र व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आंबोली नांगरतास, आंबोली मुळवंद व गेळे–बाळेभाटले शाळांतील शिक्षकांचाही प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
केंद्रप्रमुख आर. बी. गावडे यांच्या हस्ते सर्वांना अभिनंदनपत्र व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यंदा प्रथमच प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धांचे चॅम्पियनशिप आंबोली केंद्राने पटकावल्याबद्दल केंद्रप्रमुख व केंद्रातील सर्व शिक्षकांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले. कबड्डी संघाला मोलाचे मार्गदर्शन करणारे सचिन कोकितकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास समितीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जावेद तांबोळी, केंद्र मुख्याध्यापक अनिता साबळे, गेळे शाळेचे मुख्याध्यापक अनंत राऊत, तालुका उपाध्यक्ष सुहास गावडे, कोषाध्यक्ष अवधूत जाधव तसेच अमोल कोळी, अविनाश शिरगिरे, शामराव मोरे, अपय्या हिरेमठ, अनिल चाळुचे, सागर पाटील, सूर्यकांत निर्मळ, विजय शिंदे, हंसा गवस, संगीता गुडूळकर , रजिया शेख, रुपाली मोरे, ज्योती देसाई आदी शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हास्तरीय स्पर्धेतही आंबोली केंद्राचा संघ निश्चितच विजय मिळवेल, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.














