वर्ल्डकप सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

टीम इंडिया यांच्याशी करणार दोन हात
Edited by: ब्युरो
Published on: August 24, 2023 12:22 PM
views 494  views

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी आता चाळीस दिवसांचा अवधी शिल्लक आहे. स्पर्धेतील सामन्याचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता मुख्य स्पर्धेच्या आधी होणाऱ्या सराव सामन्यांचे वेळापत्रक देखील आयसीसीकडून घोषित केले गेले. त्यानुसार सर्व दहा संघ प्रत्येकी दोन सराव सामने मुख्य स्पर्धेआधी खेळतील. भारतीय संघ आपले सामने नेदरलँड्स व इंग्लंड यांच्याविरुद्ध खेळेल.

भारतात 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होईल. तर स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. त्याआधी सराव सामन्यांचा थरार रंगणार आहे. मुख्य स्पर्धे आधी एकूण दहा सराव सामने होतील. हे सामने गुवाहाटी, तिरुअनंतपुरम व हैद्राबाद येथे खेळले जाणार आहेत.

29 सप्टेंबर रोजी तीन सराव सामने होतील. बांगलादेश व श्रीलंका यांच्या दरम्यान गुवाहाटी येथे, दक्षिण आफ्रिका व अफगाणिस्तान यांच्या दरम्यान तिरुअनंतपुरम येथे, तर पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्या दरम्यान हैदराबाद येथे तिसरा सराव सामना होईल. भारत व इंग्लंड यांच्या दरम्यान 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे सराव सामना होईल. याच दिवशी तिरुअनंतपुरम येथे ऑस्ट्रेलिया व नेदरलँड सामने-सामने येतील. इंग्लंड आणि बांगलादेश यांच्या दरम्यान 2 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथे तर न्यझीलंड व दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान याच दिवशी तिरुअनंतपुरम येथे सामना होणार आहे.

तर तीन ऑक्टोबर रोजी तिरुअनंतपुरम येथे भारत विरुद्ध नेदरलँड, अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका व पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया असे सामने होतील.