सावंतवाडीच्या सुपुत्राने रत्नागिरीला जिंकून दिली MPL ट्रॉफी

निखिल नाईकच्या कामगिरीमुळे 'रत्नागिरी जेट्स'ने घडवला इतिहास...
Edited by:
Published on: June 24, 2024 08:27 AM
views 457  views

सिद्धेश कानसे 

आता इतिहास घडेल असं म्हणत रत्नागिरी जेट्स संघाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या MPL स्पर्धेत खरंच इतिहास घडवला. महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये सलग दुसऱ्यांदा रत्नागिरीचा संघ विजेता ठरला. शनिवारी रात्री झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीनं नाशिकचा पराभव केला आणि विजेतेपदावर नाव कोरलं. रत्नागिरीच्या या कामगिरीत सावंतवाडीवाडीचा सुपुत्र आणि महाराष्ट्राचा रणजीपटू निखिल नाईकचं योगदान मोलाचं ठरलं.


आयपीएल, रणजी अशा मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव असलेल्या निखिलनं MPL मध्येही आपल्या लौकिकास साजेसा खेळ केला. यंदाच्या सीझनमध्ये त्याने 12 सामन्यात 270 धावा फटकावल्या. तर यष्टीरक्षक म्हणूनही कमालीची कामगिरी बजावली. त्याची हीच कामगिरी रत्नागिरीच्या विजयात मोलाची ठरली.

पुण्याच्या गहुंजेतील MCA आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात रत्नागिरीनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 बाद 160 धावा केल्या होत्या. निखिलनं हाणामारीच्या षटकात मैदानात उतरत अवघ्या 25 चेंडूत नाबाद 36 धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे रत्नागिरीला दीडशेचा टप्पा पार करता आला. त्यानंतर नाशिकच्या संघाला 136 धावांपर्यंतच मजल मारता आली. आणि रत्नागिरीनं हा सामना 24 धावांनी जिंकून 2023 आणि 2024 आशा दोन्ही सीझनमध्ये ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम गाजवला. निखिलसह रत्नागिरीच्या संघातील कर्णधार अझीम काझी, फिरकीपटू सत्यजीत बच्छाव, धीरज फटांगरे, दिव्यांग हिंगणेकर, प्रीतम पाटील, प्रदीप दाढे यांचं योगदानही महत्वाचं ठरलं.


दरम्यान गेल्या वर्षी MPL च्या पहिल्या सीझनआधी झालेल्या लिलावात रत्नागिरीनं निखिलसाठी 3.5 लाखांची घासघशीत बोली लावली होती. पहिल्या सीझनमध्ये चॅम्पियन झाल्यावर रत्नागिरी फ्रँचायझीनं निखिलला यंदा रिटेन केलं होतं. हाच विश्वास सार्थ ठरवताना निखिलनं यंदाही धडाकेबाज परफॉरमन्स देत आपल्या संघाला थेट विजेतेपदापर्यंत नेलं.