राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींगमध्ये सावंतवाडीच्या प्रसन्ना परबला गोल्ड मेडल ; ज्युनियर गटात उपविजेतेपद

दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
Edited by: दिपेश परब
Published on: June 27, 2023 19:31 PM
views 314  views

वेंगुर्ले : महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टींग असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत वेंगुर्ला मातोंड येथील मूळ रहिवासी, सावंतवाडी सालईवाडा येथील प्रसन्ना प्रदीप परब हिने मुलींच्या सिनियर व ज्युनिअर ५७ किलो वजनी गटात दोन गोल्ड मेडल तर ज्युनिअर गटात उपविजेता चॅम्पियनशिप पटकावले आहे.  तसेच तिची आता दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

    महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व सचिवालय जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मधुकर दरेकर सर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ही ज्युनियर, सिनियर, पुरुष व महिला राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा सचिवालय जिमखाना मुंबई येथे २५ जून रोजी घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये प्रसन्ना परब हिने हे नेत्रदीपक यश संपादन केले आहे. त्यामुळे प्रसन्ना ची आता दिल्ली येते होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशात प्रसन्नाला सिंधुदुर्ग पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे संजय साटम आणि गणेश वायंगणकर व टीम शिवाजी फिटनेसचे प्रशिक्षक अमित माळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.