
सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागस्तरीय रायफल शूटिंग (पीप साईट-10 मीटर) स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडीचा विद्यार्थी कु. शिवम चव्हाण याने शानदार यश संपादन केले आहे. शिवमने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत द्वितीय स्थान पटकावून आपल्या जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे.
शिवमच्या या घवघवीत यशामुळे त्याची आता राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे, ज्यामुळे त्याच्या उज्ज्वल क्रीडा कारकिर्दीला नवी दिशा मिळाली आहे.
या यशासाठी शिवम चव्हाण याला प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री. हितेश मालंडकर आणि श्रीमती. शेरॉन अल्फांसो यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तसेच उपरकर शूटिंग रेंजचे प्रशिक्षक श्री. कांचन उपरकर यांनी त्याला विशेष प्रशिक्षण दिले.
शिवमच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मिलाग्रीस हायस्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय फादर रिचर्ड सालदाना, पर्यवेक्षिका श्रीमती संध्या मुणगेकर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शिवमच्या या यशाने सावंतवाडीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.