जिल्हास्तरीय शालेय हाॅकी स्पर्धेत सैनिक स्कूलचं घवघवीत यश

Edited by: विनायक गांवस
Published on: August 16, 2025 18:53 PM
views 10  views

सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय नेहरू कप व शालेय हाॅकी स्पर्धेत सैनिक स्कूल, आंबोलीने सर्व वयोगटात घवघवीत यश संपादन केले. सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे संघ विभाग स्तरासाठी पात्र ठरले. 

सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या भव्य पटांगणावर पार पडलेल्या या जिल्हास्तरीय हाॅकी स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूल, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल संघ १४/१५/१७ वर्षाखालील मुले व  मुली सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे प्राचार्य श्री.नितीन गावडे,जेष्ठ शिक्षक श्री.ह्रषिकेश गावडे, शिक्षण निदेशक सुभेदार मेजर शिवराज पवार, क्रिडाशिक्षक मनोज देसाई, सतिश आईर, समर शेख,हितेश मालंडकर यांच्या उपस्थितीत हाॅकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन  करून उद्घाटन करण्यात आले. क्रिडाशिक्षक मनोज देसाई सर यांनी खेळाचे नियम समजावून सांगून मार्गदर्शन केले. प्राचार्य नितीन गावडे यांनी खेळ भावना जोपासत यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. १७ वर्षा खालील शालेय हाॅकी स्पर्धा (मुले) गटांतील अतिम सामना सिंधुदुर्ग सैनिक स्कूल विरुद्ध मिलाग्रिस स्कूल असा झाला. हा सामना १२-० गोल फरकाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल संघाने एकतर्फी जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

१७ वर्षाखालील नेहरू कप स्पर्धा ( मुले) यामध्ये अंतिम सामना सैनिक स्कूल विरुद्ध मिलग्रिस हायस्कूल संघात झाला.सैनिक स्कूलने  ७-० फरकाने विजय मिळवला. १५ वर्षा खालील नेहरू कप हॉकी स्पर्धेतील अंतिम सामना सैनिक स्कूल विरुद्ध स्टेप्पिंग स्टोन कोलगाव संघात झाला.

सैनिक स्कूल संघाने २-० गोल फरकाने विजय मिळविला. १४ वर्षा खालील शालेय हॉकी स्पर्धेत अंतिम सामना स्टेपिंग स्टोन विरुध्द सैनिक स्कूल संघात झाला. सैनिक स्कूल २-० गोल फरकाने विजय संपादन केले. 

सर्व  वयोगटातील सामन्यांत घवघवीत यश मिळवत  सैनिक स्कूलच्या हाॅकी  संघाना विभाग स्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान प्राप्त झाला. हाॅकी स्पर्धेतील या दैदीप्यमान प्रदर्शनाबद्दल पॅट्रॉन ब्रिगेडियर सुधीर सावंत, अध्यक्ष श्री.सुनील राऊळ, सचिव जॉय डॉन्टस, प्राचार्य नितीन गावडे, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ, सर्व संचालक व पालक वर्ग यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.