
सावर्डे : चिपळूण येथे उमदं नेतृत्व उमेश सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त विभागस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डेची आरोही पालखडे हिने उल्लेखनीय कामगिरी करत पाच सुवर्ण पदके व चॅम्पियनशिप पटकावली.
या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील ५० हून अधिक जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. तीव्र स्पर्धेतही आरोहीने आपले कसब दाखवत ५० मीटर फ्रीस्टाइल, १०० मीटर फ्रीस्टाइल, १०० मीटर बॅकस्ट्रोक, १०० मीटर ब्रिस्ट्रोक आणि २०० मीटर आय.एम. या पाचही प्रकारांमध्ये सुवर्ण पदके पटकावून स्पर्धेतील चॅम्पियनशिपचा मान पटकावला. तिच्या नेत्रदीपक खेळामुळे स्पर्धेत उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार कौतुकाचा वर्षाव केला.
आरोहीला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे आणि प्रशांत सकपाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाने विद्यालयासह पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमींचा अभिमान वाढवला आहे.
आरोहीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार श्री. शेखरजी निकम, ज्येष्ठ संचालक व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी, सचिव महेश महाडिक, शालेय समितीचे पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, सर्व शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिला शुभेच्छा व अभिनंदन दिले. पंचक्रोशीतील पालकवर्ग व क्रीडाप्रेमींनीही आरोहीचा गौरव केला आहे.
आरोहीच्या सुवर्ण कामगिरीमुळे सावर्डे विद्यालयाने विभागस्तरीय जलतरण स्पर्धेत आपला ठसा उमटवला असून भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावर तिच्याकडून अधिक यशाची अपेक्षा व्यक्त होत आहे.