वैभववाडी : तालुक्यातील कुसुर येथील रामेश्वर स्पोर्टस यांनी आयोजित केलेल्या ७० किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेत संघर्ष फोंडा संघ विजेता ठरला तर जय गणेश वैभववाडी संघ उपविजेता ठरला. कोल्हापूर येथील शिवछावा सावरवाडी संघाने तृतीय क्रमांक मिळविला.
कुसुर पावनादेवी होळीचा मांड येथे होळीनिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील दहा संघानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन गावच्या सरपंच शिल्पा पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष सिताराम पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस निरीक्षक अमित यादव, राहुल पवार तसेच उपसरपंच प्रकाश झगडे, समाधान साळुंखे, दाजी पाटील, श्रीकांत नेवरेकर, तलाठी गणपत शिंदे, चंद्रकांत कुळये आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा अंतिम सामना संघर्ष फोंडा विरुद्ध जय गणेश वैभववाडी यांच्यात झाला. या अटीतटीच्या सामन्यात संघर्ष फोंडा या संघाने विजय मिळविला. विजेत्या संघाला रोख रुपये ८००० व चषक उपविजेत्या संघाला ५००० व चषक तर तिसऱ्या क्रमांक मिळवणाऱ्या संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील कुसुर विरूद्ध लोरे संघाचा सामना अत्यंत रोमहर्षक झाला. दोन वेळा सामना 'टाय' झाला. अखेर गोल्डन चढाईमध्ये कुसुर संघाने विजय संपादन केला. या संपूर्ण स्पर्धेकरिता पंच म्हणून मधुकर पाटील, स्वप्निल कोकरे, महेश सावंत, विलास जाधव, एस. के. पाटील, संदेश तुळसणकर, शुभम सावंत, श्री. शेळके, श्री. देवकर इत्यादींनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रामेश्वर स्पोर्टस क्लबच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली .