नवी दिल्ली : भारताचा कर्णधार रोहित शर्मा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मंगळवारपासून (26 डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो संघाची धुरा सांभाळणार आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत रोहित शर्माने पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र यावेळी टी-20 विश्वचषकाच्या प्रश्नावर रोहित शर्मा भडकल्याचे पाहायला मिळाले. माध्यमांशी बोलताना पत्रकार रोहित शर्माला त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल वारंवार विचारत होते. तो टी-20 विश्वचषक खेळणार की नाही याबाबत पत्रकारांना त्याच्याकडून जाणून घ्यायचे होते. यामुळेच एका पत्रकाराने रोहित शर्माला विचारले की, पुढील एकदिवसीय विश्वचषक चार वर्षांनंतर आहे. मात्र त्याआधी पुढील सहा महिन्यांत दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका आणि टी-20 विश्वचषक होणार आहे. यात ज्येष्ठ खेळाडूंनी सामने जिंकले तर काही प्रमाणात फायदा होईल का? तुम्ही किंवा विराट कोहली यासंदर्भात विचार करत आहेत का?, असे प्रश्न विचारले.
पत्रकाराने विचारले की, तुम्ही टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी उत्सुक आहात का? या प्रश्नावर रोहित शर्मा भडकला. त्यांनी म्हटले की, ‘क्रिकेट खेळण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. जिथे संधी मिळेल तिथे प्रत्येकाने चांगले प्रदर्शन केले पाहिजे. मला माहित आहे तुम्ही काय म्हणायचा प्रयत्न करत आहात, पण तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, असे रोहित शर्मा म्हणाला.दरम्यान, रोहित शर्मा 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य होता. 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याला संधी मिळाली नाही. 2013 मध्ये भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, तेव्हा रोहित शर्मा सलामीचा फलंदाज होता. मात्र त्यानंतर भारतीय संघाने आतापर्यंत एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. 2023 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप आणि विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.