नायशीचा रत्न रोहन घागचा ‘एमपीएल २०२५’मध्ये तेजस्वी जलवा

मराठा रॉयल्सला विजेतेपद मिळवून दिले
Edited by: मनोज पवार
Published on: June 25, 2025 16:04 PM
views 178  views

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नायशी गावचा सुपुत्र रोहन राजन घाग याने अवघ्या १९ व्या वर्षी मुंबई प्रीमियर लीग (MPL) T20 - 2025 या प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धेत आपल्या भेदक आणि अचूक गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मराठा रॉयल्स संघाचा तो अविभाज्य भाग ठरला असून, त्याच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे संघाने यंदाचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी रोहनचा दूरध्वनीवरून खास सत्कार केला. त्याचप्रमाणे, संपूर्ण नायशी पंचक्रोशी आणि चिपळूण तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, कोकणवासीयांचा त्याच्यावर अभिमान बळावला आहे.

डाव्या हाताचा जलदगती गोलंदाज म्हणून खेळताना रोहनने अनेक निर्णायक क्षणी प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव निर्माण करत संघाला सामन्यात वरचढ ठेवले. त्याच्या वेगवान आणि अचूक माऱ्यामुळे मराठा रॉयल्स संघाने स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवत विजेतेपदावर मोहोर उमटवली.

रोहनचे मूळगाव नायशी असून, त्याला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. त्याने अगदी बालवयातच क्रिकेट प्रशिक्षण सुरू केले. सध्या तो मुंबईतील शिवडी परिसरात वास्तव्यास असून, वरळी येथील पोद्दार महाविद्यालयात तो शिक्षण घेत आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

रोहन गेल्या काही वर्षांपासून मुंबई क्रिकेट क्षेत्रात सातत्याने कामगिरी करत आहे. त्याने मागील वर्षी मुंबईच्या १९ वर्षांखालील (U-19) संघाचे यशस्वी प्रतिनिधित्व केले होते. रिलायन्स टूर्नामेंट, कूच बिहार ट्रॉफी, कांगा लीग, टाइम्स शील्ड, राठोड ट्रॉफी, प्रेसिडेंट कप, पुरुषोत्तम शील्ड, इंटर कॉलेज टूर्नामेंट अशा विविध नामांकित स्पर्धांमध्ये त्याने प्रभावी खेळ करत अनुभव संपादन केला आहे.