रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीने स्पर्धकांना केलं 'चेकमेट'

Edited by: विनायक गांवस
Published on: January 07, 2026 16:53 PM
views 28  views

सावंतवाडी : रोटरी क्लब, बेळगाव आणि बेळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनतर्फे बेळगाव येथे दुस-या शतरंज रॅपिड रेटिंग राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीच्या बाळकृष्ण पेडणेकर, मयुरेश परुळेकर, तनिष तेंडोलकर, हर्ष राऊळ, अथर्व वेंगुर्लेकर, राजेश विरनोडकर या सहा विदयार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. विशेष म्हणजे ॲकेडमीचे हे सहाही विद्यार्थी आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू आहेत. स्पर्धेत देशभरातील तीनशे पासष्ट खेळाडूंनी सहभाग घेतला.                        

ॲकेडमीचा जिल्ह्यातील आघाडीचा राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर याने नऊ राऊंड्समध्ये सहा राऊंड्स जिंकून एक राऊंड बरोबरीत सोडवून साडेसहा गुणांची कमाई केली. बाळकृष्णने मुख्य गटात एकोणीसावा क्रमांक पटकावला. बाळकृष्णला रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. ॲकेडमीचा मालवण येथील पन्नास टक्के दृष्टिदोष असलेला विदयार्थी मयुुरेेश परुळेकर याने साडेपाच गुण मिळवून व्हिज्युअली चॅलेंज गटात पहिला क्रमांक पटकावला. मयुुरेेशला चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

ॲकेडमीचा कुडाळ येथील विद्यार्थी तनिष तेंडोलकर याने या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करुन साडेपाच गुणांसह एकेचाळीस आंतरराष्ट्रीय रेटिंग पाॅईंट्स मिळवले. मयुरेश, हर्ष, बाळकृष्ण यांनी देखील आपल्या आंतरराष्ट्रीय रेटिंग पाॅईंट्समध्ये वाढ केली. सर्व विदयार्थ्यांना मुक्ताई ॲकेडमीचे विश्वस्त अध्यक्ष आणि बुदधिबळ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर आणि राष्ट्रीय बुदधिबळ प्रशिक्षक श्री.उत्कर्ष लोमटे यांचे मार्गदर्शन मिळाले. ॲकेडमीच्या विश्वस्त सचिव सौ.स्नेहा पेडणेकर यांनी सर्व विदयार्थ्यांचे कौतुक केले. सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.