गोवा मांद्रे क्रिकेट स्पर्धेत राजाराम वॅारियर्स तळवडे महाविजेता

Edited by: दिपेश परब
Published on: April 17, 2023 18:41 PM
views 207  views

सावंतवाडी :

          गोवा राज्यातील मांद्रे स्पोर्टस ॲकॅडमी आयोजित एक गाव एक संघ स्वरुपाच्या "मांद्रे सरपंच चषक" क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे उद्योजक राजाराम गावडे यांच्या मालकीच्या राजाराम वॅारियर्स तळवडे संघाने गोवा राज्यातील बलाढ्य आरवी कोरगाव संघावर मात करुन महाविजेते पद पटकावले. हे विजेतेपद पटकावून गोवा राज्यात तळवडे संघाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तसेच तळवडे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून इतिहास घडवला. 

         स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोरगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले तळवडे संघाने लतेश साळगावकरच्या १२ चेंडूत २४ धावा अक्षय घाटवळच्या १५ धावांच्या जोरावर मर्यादित ८ षटकात ५९ धावा जमवून ६० धावांचे आव्हान ठेवले . त्यानंतर ६० धावांचे आव्हान स्वीकारुन मैदानात उतरलेल्या कोरगाव संघाला अवघ्या ४५ धावांवर रोखून तळवडे संघाने विजय संपादन केला . तळवडे संघाकडून सौरभ नाईक ३ व अक्षय घाटवळ व निखिल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला . कोरगाव संघाच्या अनिकेत देसाई यांने २० धावा जमवल्या . या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मांद्रे विधानसभेचे आमदार जीत आरोलकर,मांद्रे सरपंच अमित सावंत, तळवडेतील उद्योजक राजाराम गावडे,तसेच मांद्रे ग्रामपंचायत सर्व सदस्य व आदी मान्यवर उपस्थित होते.

        यावेळी स्पर्धेच्या विजेत्या संघाला ५ लाख १११ रुपये व चषक , उपविजेत्या संघाला ३ लाख 33 हजार 333 रुपये व उपांत्य फेरीत पराभूत संघाना ८८८८८ रुपये व चषक प्रदान करण्यात आला . यावेळी स्पर्धेतील मालिकावीर म्हणून कोरगाव संघाच्या अनुश केरकर उकृष्ट फलंदाज तळवडे संघाचा गोपाळ बट्टा उकृष्ट गोलंदाज तळवडे संघाचा प्रविण कुबल यांना गौरविण्यात आले . या खेळाडूना चषक व एलईडी टिव्ही देऊन गौरविण्यात आले.

    या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळवडे संघ अंतिम फेरीत दाखल झाल्याने सिंधुदुर्ग व गोवा राज्यातील क्रिकेट रसिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती . विजेत्या राजाराम वॅारियर्स तळवडे संघाने विजेतेपद पटकावून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्याबद्दल सामाजिक कला क्रिडा तसेच राजकीय क्षेत्रातून संघ संघमालक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .