सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. येथील युवक प्रचंड नैसर्गिक गुणसंपन्न आहेत, मात्र शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळत नसल्याने ते कोठेतरी मागे पडतात. आता एस. के. क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून खेळाडूंच्या नैसर्गिक गुणवत्तेला शास्त्रशुद्ध पैलू पाडले जातील. त्यामुळे आगामी काळात येथील खेळाडू राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्चितच आपली छाप सोडतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी कोलगाव येथे व्यक्त केला.
कोलगाव येथे रविवारी एस. के. क्रिकेट अकॅडमीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नंदकुमार कदम, विद्यापीठ, राष्ट्रीय, गोवा विद्यापीठ कोच मंदार कदम, सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी काशिनाथ दुभाषी, सामाजिक कार्यकर्ते एल. एम. सावंत, एस.के. क्रिकेट अकॅडेमी अध्यक्ष दिनेश सावंत, कोकणसाद LIVE चे मुख्य संपादक सागर चव्हाण, माजी सरपंच मधुकर उर्फ अनिल नाईक, तसेच अनेक खेळाडू, क्रिकेटप्रेमी आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत मंदार कदम, सौ. शिल्पा कदम यांनी केले
यावेळी अर्चना घारे परब यांच्या हस्ते मल्टी ग्रास व पारंपरिक मॅटचे उद्घाटन करण्यात आले.
दरम्यान शुभेच्छा देताना कोकणसाद LIVE चे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि विशेषत: सावंतवाडी तालुक्यात आणि कोलगाव या गावात अनेक खेळाडू व विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी आपल्या कार्याची छाप सोडली आहे. एस. के. अकॅडेमीच्या माध्यमातून आणि मंदार कदम या कोलगावच्या गुणी युवा खेळाडूच्या माध्यमातून आगामी काळात अभिनव अशा पद्धतीचे दर्जेदार व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात आली आहे. ही कोलगाववासियांसाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. खेळाडूंना लहानपणापासून असे शास्त्रशुद्ध धडे दिले तरच ते राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकतील. आता ती सुविधा कोलगावसारख्या ग्रामीण भागात झाली असल्यामुळे अकॅडेमीच्या वाटचालीसाठी जे जे सहकार्य लागेल ते सर्व केले जाईल, असे सांगत अकॅडेमीच्या पुढील वाटचालीस श्री. चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित असलेले सर्व मान्यवरांनी मंदार कदम यांचे अभिनंदन करत क्रिकेट अकॅडेमीच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले.