
कुडाळ : एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी पाट व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या निमंत्रित राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेची प्राथमिक नियोजन बैठक नुकतीच पार पडली. संस्थेचे कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीस सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे कार्यवाह दिनेश चव्हाण, मुख्याध्यापक राजन हंजनकर, माजी विद्यार्थी तथा क्रीडाशिक्षक राजन मयेकर, दाजी उर्फ सिताराम रेडकर, कबड्डी पंच हर्षल रेडकर, शिक्षक सुधीर देसाई सर, केरकर सर, संदीप साळसकर सर, विजय मेस्त्री, पर्यवेक्षक बोन्दर सर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई शहर, उपनगर, पुणे, ठाणे, कोल्हापूर, रायगड, वाशिम, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील दर्जेदार व नामांकित पुरुष आणि महिला संघांचा समावेश निश्चित करण्यात आलेला आहे. खेळाडूंची निवास व्यवस्था, पंच, पदाधिकारी यांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्था आदींबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. मैदान समिती प्रमुख दाजी रेडकर व राजन मयेकर यांनी चार मातीची मैदाने बनविण्याचे काम प्रगतीवर असल्याबाबत माहिती दिली. सद्यस्थितीत २५ डंपर माती मैदानासाठी उपलब्ध करून दिल्या बाबत कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर यांनी सांगितले असून अजूनही आवश्यक बाबींची पूर्तता मैदान समितीकडे केली जाईल असे त्यांनी सांगितले. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रो कबड्डी खेळाडूंची प्रसिद्धी, सर्व संघांचे स्वागत, संचलन, कुस्ती स्पर्धा, उद्घाटन कार्यक्रम, स्पर्धा यशस्वीतेसाठी विविध समित्या आदीबाबतची रुपरेषा व नियोजन सुरू असल्याबाबत मुख्याध्यापक राजन हंजनकर यांनी सांगितले. प्रत्यक्ष मैदानावर जाऊन सर्वांनी सद्यस्थितीतील मैदानाची पाहणी केली. मैदान आखणी, दोन मैदानांमधील अंतर, प्रेक्षक गॅलरी, स्टेज, पंच बैठक व्यवस्था, चेंजिंग रूम, बाथरूम्स, लाईट व्यवस्था, साऊंड सिस्टम आदीबाबत कार्यवाह दिनेश चव्हाण यांनी आढावा घेतला. संस्थेचे अध्यक्ष डी. ए. सामंत साहेब व सचिव विजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या स्पर्धेच्या आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे असे कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर यांनी सांगितले .














