राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत प्रज्योती जाधवने पटकावले सुवर्ण पदक

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 31, 2025 15:35 PM
views 20  views

कणकवली : रत्नागिरी जिल्ह्यातील  डेरवण येथे झालेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर क्युरोगी आणि ११ व्या पूमसे तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अकॅडमीची प्रज्योती जाधव हिने सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच प्रणव कुडाळकर याने कास्य पदक पटकावले आहे. 

तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्यावतीने  देवाशिष नर, प्रणव कुडाळकर, अथर्व तेली, व मुलींमध्ये दुर्वा गावडे आणि प्रज्योती जाधव अशा एकूण पाच खेळाडूंनी राज्य स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. त्यापैकी 

प्रज्योती जाधव हिने ५९ ते ६३ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले असून तिची बेंगलोर येथे ३१ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर  या कालावधी मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेकरिता निवड झाली आहे. प्रणव कुडाळकर याने ४५ ते ४८ वजनी गटात कास्यपदक मिळवले. दोन्ही खेळाडू कणकवली नगरवाचनालय येथील मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अकॅडमी मध्ये राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत.

सर्व खेळाडूंचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे पदाधिकारी भालचंद्र कुलकर्णी, सुधीर राणे, अमित जोशी, विनायक सापळे यांनी अभिनंदन केले आहे.