पुणे : मागील पाच महिन्यांपासून महाराष्ट्र कुस्ती क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. जुलै महिन्यात राष्ट्रीय कुस्ती परिषदेने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर काही दिवसांनी नवी कार्यकारणी जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा बरखास्ती रद्द करण्यात आली. तेव्हापासून खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवी कार्यकारणी व जुन्या कार्यकारिणीचे सचिव बाळासाहेब लांडगे यांच्या दरम्यान शीतयुद्ध सुरू होते.
राजकीय हेतूने परिषद बरखास्त केल्याचा आरोप बाळासाहेब लांडगे यांनी केला होता. त्यामुळे आपण अहमदनगर येथे यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करणार असल्याचे त्यांनी जाहीर केलेले. तर, नवे अध्यक्ष व भाजप खासदार रामदास तडस यांनी ही स्पर्धा पुणे येथे होईल असे म्हटलेले. त्यामुळे नक्की कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हायचे असा संभ्रम कुस्तीपटूंमध्ये होता. आता या संपूर्ण प्रकरणावर तोडगा निघाला आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या दरम्यान एक बैठक झाली. त्यामध्ये आगामी महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून रामदास तडस हेच काम पाहतील. तर, कार्याध्यक्ष म्हणून ऑलिम्पियन काका पवार यांच्याकडे जबाबदारी असेल. स्पर्धेचे मुख्य सल्लागार म्हणून शरद पवार यांची नियुक्ती केली आहे. तर, बाळासाहेब लांडगे सल्लागाराची भूमिका निभावतील. तर, महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुढील वर्षी ११ ते १५ जानेवारी या कालावधीत पुणे येथे पार पडेल.