पटना पायरेट्सचा फडशा पाडत पुणेरी पलटण सेमी फायनलमध्ये

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 10, 2022 17:20 PM
views 243  views

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात सोमवारी (5 डिसेंबर) पुणेरी पलटण व पटना पायरेट्स हे संघ आमनेसामने आले. यापूर्वीच प्ले ऑफमध्ये जागा बनविलेल्या पुणेरी पलटणने या सामन्यात आपला दबदबा राखत पटना पायरेट्सला 44-30 असे पराभूत करत उपांत्य फेरीत जागा मिळवली. या हंगामात उपांत्य फेरीत जागा मिळवणारा पुणे पहिला संघ बनला. 

हैदराबाद येथे सुरू असलेल्या साखळी फेरीचा अखेरच्या काही दिवसांमध्ये सामने चांगलेच उत्कंठावर्धक होताना दिसले. आधीच प्ले ऑफमध्ये जागा बनविलेल्या पुणे संघाने प्रमुख रेडर अस्लम इनामदार व मोहित गोयत यांच्या अनुपस्थितीत मैदानात पाऊल ठेवले. पुणे संघाने अपेक्षेप्रमाणे सामन्यात आक्रमक सुरुवात केली. आकाश शिंदे याने पुणे संघाच्या आक्रमणाचे नेतृत्व केले. त्याला पंकज मोहिते याने साथ दिली. पहिल्या हाफच्या अखेरीस पुणे संघाकडे 19-10 अशी भक्कम आघाडी होती.

दुसऱ्या हाफमध्ये देखील पुणे संघाने कोणतीही वेगळी रणनिती न आखता आक्रमण सुरूच ठेवले. यावेळी नबीबक्ष याने पुणे संघासाठी जबरदस्त खेळ दाखवला. कर्णधार फझल अत्राचली याने देखील चार गुणांची कमाई केली. अखेरच्या दोन मिनिटात पुणे संघाने आपल्या बाकावरील सर्व खेळाडूंना संधी दिली. पूर्ण वेळानंतर सामन्याचा निकाल 44-30 असा राहिला. या विजयासह पुणे संघ उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. आता पुणेरी पलटणला आपला अखेरचा साखळी सामना युपी योद्धाजविरुद्ध खेळायचा आहे.