जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पाट हायस्कूलचे वर्चस्व कायम

Edited by: दिपेश परब
Published on: October 15, 2025 18:11 PM
views 18  views

वेंगुर्ले: शालेय जिल्हास्तरीय १४ व १७ वर्षे मुले व मुली व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक ७ ऑक्टोबर  रोजी पाट हायस्कूलच्या मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत पाट हायस्कूलच्या चारही संघानी विजय संपादन करून पाट हायस्कूलची विजयी परंपरा कायम ठेवली. या संघाची निवड आष्टा सांगली येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. 


या स्पर्धेचे उदघाटन उद्योजक एस. एल. ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष डी. ए. सामंत, संस्थेचे चेअरमन देवदत्त साळगावकर, संस्था सचिव विजय ठाकूर, संस्था संचालक अवधूत रेगे, राजेश सामंत, सुधीर मळेकर, दीपक पाटकर व प्रशालेचे मुख्याध्यापक आर. एस. हंजनकर, पर्यवेक्षक एस. बी. बोंदर उपस्थित होते. मान्यवराचे परिचय व स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक हंजनकर यांनी केले तसेच सूत्रसंचालन प्रशालाचे सहाय्यक शिक्षक संदीप साळसकर यांनी केले. उपस्थित खेळाडूंना संस्थेचे सचिव विजय ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे समालोचन आबा कोचरेकर व प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री केरकर यांनी केले आणि सर्व मान्यवराचे आभार प्रशालेचे पर्यवेक्षक बोंदर यांनी मानले. स्पर्धेत पंच म्हणून राष्ट्रीय पंच जगदाळे व इब्राहिम शेख, अमित हर्डीकर, ओंकार पाटकर, गीतेश राऊळ, शिवराम नांदोसकर, यशवंत कोळंबकर, राजेश गोवेकर यांनी स्पर्धेचे पंच म्हणून कामगिरी केली. 


पाट हायस्कूलच्या १४ वर्षे मुलांचा अंतिम सामना देवबाग मालवण संघाबरोबर झाला. या सामन्यात  पाट हायस्कूल संघाने तीन सेट पैकी दोन शून्य अशा फरकाने मालवण संघावर मात करत विजय संपादन केला. तर १४ वर्षे मुलीच्या संघाने अंतिम सामन्यात त्रिंबक हायस्कूल मालवण या संघावर मात करून विजय मिळवला. १७ वर्षे मुलींचा अंतिम सामना एस एम हायस्कूल कणकवली बरोबर झाला या सामन्यात पाट हायस्कूलने कणकवली संघावर मात करून विजय संपादन केला. तर १७ वर्षे मुलांच्या संघाने वेंगुर्ले हायस्कूल वेंगुर्ले या संघावर अंतिम सामन्यात वेंगुर्ला संघाचा पराभव करून विजय मिळवला. 


चारही संघातील खेळाडूना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री हंजनकर, क्रीडा शिक्षक श्री पवार, श्री कुबल, राष्ट्रीय खेळाडू रुपेश कोनकर, चारुहास वेंगुर्लेकर व आजी-माजी खेळाडू व पालक वर्ग दाजी रेडकर, ग्रामस्थ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना संस्था पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.