टी20 विश्वचषक 2024 च्या 11व्या सामन्यात अमेरिकेनं सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव करून खळबळ उडवून दिली आहे. या विजयासह अमेरिकेचा संघ गट ‘अ’ मध्ये अव्वल स्थानावर पोहोचला.
गुरुवारी (६ जून) डल्लास येथील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर अमेरिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्ताननं 20 षटकात 7 विकेट गमावत 159 धावा केल्या. बाबर आझमनं 43 चेंडूत 44 धावा केल्या. शादाब खाननं 25 चेंडूत 40 धावा केल्या. शाहीन आफ्रिदीनं नाबाद 23 धावा केल्या. अमेरिकेकडून नॉस्तुश केंजिगेनं 3, सौरभ नेत्रावळकरनं 2 बळी घेतले. अली खान आणि जसदीप सिंग यांना 1-1 विकेट मिळाली.
160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेनं 20 षटकांत 3 गडी गमावून 159 धावा केल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. मोनांक पटेलनं 50, ॲरॉन जोन्सनं नाबाद 36 धावा केल्या. अँड्रिज गॉसनं 35 धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिर, नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी 1-1 बळी घेतला.
बाबर आझमनं सुपर ओव्हरमध्ये अनुभवी मोहम्मद आमिरवर विश्वास दाखवला. अमेरिकेकडून ॲरॉन जोन्स आणि हरमीत सिंग फलंदाजीसाठी मैदानात उतरले. मोहम्मद आमिरच्या पहिल्याच चेंडूवर आरोन जोन्सनं चौकार ठोकला. पुढच्या चेंडूवर 2 धावा केल्या. यानंतर 1 धाव केली. पुढचा चेंडू वाईड होता. यावर एक धाव आली. चौथ्या चेंडूवर 1 धाव आली. पुढचा चेंडू वाईड झाला आणि बाय वरून एक धाव झाली. पुढच्या चेंडूवर ॲरॉन जोन्सनं 2 धावा केल्या. पुढच्या चेंडूवर वाईडसह 3 धावा आल्या. शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली आणि जोन्स धावबाद झाला. आमिरनं एकूण 9 चेंडू टाकले. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेनं 1 गडी बाद 18 धावा केल्या. पाकिस्तानसमोर विजयासाठी 19 धावांचं लक्ष्य होतं.
पाकिस्तानकडून सुपर ओव्हरमध्ये फखर जमान आणि इफ्तिखार अहमद क्रीझवर आले. अमेरिकेकडून सौरभ नेत्रावळकरनं गोलंदाजी केली. नेत्रावळकरच्या पहिल्या चेंडूवर इफ्तिखार अहमदला एकही धाव करता आली नाही. पुढच्या चेंडूवर त्यानं चौकार मारला. पुढचा चेंडू वाईड होता. पुढच्याच चेंडूवर इफ्तिखार बाद झाला. मिलिंद कुमारनं त्याचा उत्कृष्ट झेल घेतला. यानंतर शादाब खान क्रीझवर आला. हा चेंडू वाईड होता. चौथ्या चेंडूवर लेग बाय मिळाला. पुढच्या चेंडूवर 2 धावा आल्या. शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला सुपर ओव्हर टाय करण्यासाठी षटकारही आवश्यकता होती. मात्र शादाब केवळ एकच धाव घेऊ शकला. अशाप्रकारे पाकिस्तानला हरवून अमेरिकेनं इतिहास रचला.