पाकिस्तानने नेदरलँड्सला 6 विकेट्सने धूळ चारली

टी20 विश्वचषकातील पहिला विजय
Edited by: ब्युरो
Published on: October 30, 2022 21:48 PM
views 169  views

सलग दोन पराभवानंतर पाकिस्तान संघाचा टी20 विश्वचषक 2022मधील तिसरा सामना रविवारी (दि. 30 ऑक्टोबर) पर्थ येथे नेदरलँड्सविरुद्ध खेळला गेला. हा सामना पाकिस्तानने 6 विकेट्सने आपल्या खिशात घातला. या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी आपले सर्वोत्तम योगदान देत संघाला पहिला विजय मिळवून दिला. यामध्ये सलामीवीर मोहम्मद रिझवान याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयामुळे पाकिस्तान संघाची उपांत्य सामन्यात जाण्याची शक्यता वाढली आहे.


या सामन्यात नेदरलँड्स संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स (Scott Edwards) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवत नेदरलँड्सच्या फलंदाजांना घाम फोडला. नेदरलँड्सने यावेळी फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 91 धावाच केल्या. 92 धावांचे हे आव्हान पाकिस्तानने 13.5 षटकात 4 विकेट्स गमावत पूर्ण केले.

पाकिस्तानकडून फलंदाजी करताना सलामीवीर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने 39 चेंडूत 49 धावा केल्या. त्याला त्याचे अर्धशतक पूर्ण करता आले नाही. या धावा करताना त्याने 5 चौकारही मारले. यावेळी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) त्याला साथ देऊ शकला नाही. तो फक्त 4 धावांवरच तंबूत परतला. पुढे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या फखर झमान (Fakhar Zaman) याने 20 धावांचे योगदान दिले. त्यानंतर शान मसूद यानेही 12 धावा केल्या. यानंतर सहाव्या क्रमांकावर आलेल्या शादाब खान याने विजयी चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला.


यावेळी नेदरलँड्सकडून गोलंदाजी करताना ब्रेंडन ग्लोव्हर याने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. त्याने फखर झमान याला झेलबाद करत तंबूत धाडले. तसेच, शान मसूद यालाही झेलबाद करत पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याच्याव्यतिरिक्त पॉल व्हॅन मीकरन यानेही एक विकेट आपल्या नावावर केली.


तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सकडून कॉलिन एकरमन याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 27 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार स्कॉट एडवर्ड्स (Scott Edwards) याने 15 धावांचे योगदान दिले. या दोघांव्यतिरिक्त इतर कुणालाही दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही. त्यामुळे संघाला 100 ही धावसंख्याही गाठता आली नाही.


यावेळी पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना शादाब खान याने सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कामगिरी केली. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 22 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त मोहम्मद वसीम याने 2 विकेट्स घेतल्या. तसेच, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफ यांना प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आले.