मैदान कुठलेही असो एकजुटीने जिंकायचं! - आ. आदित्य ठाकरे

रोह्यात राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेला सुरुवात कुमार गटात पुणे, कुमारी गटात ठाण्याची विजयी सलामी
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 10, 2022 14:55 PM
views 269  views

शशिकांत मोरे

रोहा : शहरी भागात खेळाची मैदाने सध्या आर्टीफिशियल बनली असली तरी मातीत खेळण्याची मजा वेगळी असून मातीचा सुगंधही वेगळा आहे. त्यामुळे मातीची मैदाने टिकली पाहिजेत. क्रिकेट या खेळाचा प्रसार झाला, कारण या खेळाचे अॅडमिनिस्ट्रेशन गावोगावी आहे. गावातील मुले, मुली या खेळात पुढे आली आणि आपण जगात क्रिकेट खेळात एक नंबर बनलो. देशाला एकत्र आणण्याचे काम खेळ करतो. नेल्सन मंडेला यांनी फुटबॉल खेळाच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिका देश एकत्र आणला आणि देश स्वतंत्र झाला. रोह्याच्या या स्पर्धेतून कुमार आणि मुलींची निवड चाचणी होणार आहे. या निवड चाचणीतून महाराष्ट्राच्या संघाचा झेंडा तुमच्या हातात येणार आहे.महाराष्ट्रासाठी पदके आणण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. त्यामुळे मैदान कुठलेही असो, त्याठिकाणी एकजुटीने राहायचं आणि जिंकायचं!, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे  शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे  क्रीडापटूंना सल्ला देताना म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रोह्यात धाटाव येथील प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले व एम. बी. मोरे फांउंडेशन विद्यालयाच्या कै. नथुरामभाऊ पाटील क्रीडानगरी येथे ४ दिवसीय आयोजित ४८ व्या कुमार, मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राज्यभरातील क्रीडापटूंना प्रोत्साहन देताना ठाकरे बोलत होते. यावेळी रायगड खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा आमदार अनिकेत तटकरे, माजी मंत्री आ. अदिती तटकरे, उद्योजक पूनित बालन, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, खो-खो असोसिएशनचे महाराष्ट्र सरचिटणीस ॲड. गोविंद शर्मा, उपाध्यक्ष विजय मोरे, जिल्हा चिटणीस सुरेश मगर, खो-खो असोसिएशनचे तालुकाध्यक्ष विनोद पाशीलकर, अलंकार कोठेकर, जिल्हा सचिव आशिष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात ठाकरे पुढे म्हणाले की, मी मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचा अध्यक्ष आहे. अशी मोठी स्पर्धा भरवताना येणाऱ्या मोठ्या जबाबदारीची मला जाणीव आहे. मैदानी खेळासाठी गावागावातून मुले-मुली येथे येतात, त्यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल अनिकेत तटकरे यांचे कौतुक करीत एका मैदानी खेळासाठी मला रोह्यात बोलवलेत. मी आज महाराष्ट्रासाठी आणि आपल्या मातीसाठी चांगले करण्याच्या भावनेतून इथे आलो आहे. महाराष्ट्र काय आहे हे राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळवून दाखवून द्या, असे आवाहन करीत स्पर्धकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

      या स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे नेतृत्व कोण करणार हे पहायला मिळणार आहे याचा मनापासून आनंद असल्याचे माजी मंत्री आ. अदिती तटकरे यांनी मत व्यक्त केले. तर आपल्या प्रास्ताविकात लाल मातीतल्या खो-खो खेळाचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या माध्यमातून ही राज्यस्तरीय स्पर्धा भरविण्यासाठी एक आयोजक म्हणून आम्हाला संधी मिळाली, याचा मला निश्चितच अभिमान आहे, असे आ. अनिकेत तटकरे म्हणाले. यावेळी उद्योजक पूनित बालन, गोविंद शर्मा यांनीही आपली मते मांडली.

या स्पर्धेसाठी राज्यातील ४८ संघ आणि ९०० हून अधिक खेळाडू, मार्गदर्शक, प्रशिक्षक व संघटनेचे पदाधिकारी रोह्यात दाखल झाले असल्याने रायगडकरांना खो-खोच्या वेगवान खेळाची मजा लुटता येणार आहे. दरम्यान, सायंकाळी उशिरा सुरू झालेल्या कुमार गटात पुण्याने जालन्याचा २२-८ असा एक डाव १४ गुणांनी पराभव केला. पुण्यातर्फे दिनेश म्हस्कर, विनायक शिंगाडे यांनी चांगला खेळ करत पुण्याला मोठा विजय मिळवून दिला. मुली गटात ठाण्याने बीडवर १९-९ असा एक डाव १० गुणांनी विजय मिळवला. ठाण्याच्या धनश्री कंक, प्रीती बालगरे, कल्याणी कंक यांनी बहारदार कामगिरी केल्याचे पहावयास मिळाले.