कुठलाच भारतीय खेळाडू घालू शकणार नाही धोनीचा जर्सी नंबर ७

Edited by:
Published on: December 15, 2023 16:10 PM
views 184  views

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज कर्णधार एमएस धोनी याची प्रतिष्ठित ७ नंबरची जर्सी आता कुठल्याच इतर भारतीय खेळाडूसाठी उपलब्ध नसेल. कारण, धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीच्या जवळपास ३ वर्षांनंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने सांगितले आहे की, संपूर्ण कारकीर्दीत धोनीने जो नंबर त्याच्या टी शर्टवर परिधान केला होता, तो आता निवृत्त करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. खरं तर, सचिन तेंडुलकर याच्या निवृत्तीनंतर काही काळाने त्याचा १० जर्सी नंबरही निवृत्त केला गेला होता.

महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ चा टी२० विश्वचषक, २०११ चा वनडे विश्वचषक आणि २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. एमएस धोनी एकमेव कर्णधार आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली संघाने आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत. धोनीला ट्रिब्यूट देण्यासाठी बीसीसीआयने त्याचा जर्सी नंबर निवृत्त केला आहे. हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने (BCCI) भारतीय क्रिकेटपटूंना याबाबत सूचना दिली आहे की, ते धोनीचा ७ नंबर आपला जर्सी नंबर म्हणून घेऊ शकत नाहीत.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना म्हटले की, युवा क्रिकेटपटू आणि भारतातील सध्याचे क्रिकेटपटू यांना सूचना देण्यात आली आहे की, ते एमएस धोनीचा ७ जर्सी नंबर वापरू शकत नाहीत. नवीन खेळाडूंना ७ आणि १० जर्सी नंबर मिळू शकत नाही. सचिन तेंडुलकर याचा जर्सी नंबर आधीच निवृत्त करण्यात आला आहे.

बीसीसीआयचा हा निर्णय भारतीय क्रिकेटपटूंपर्यंतच मर्यादित असेल. आयसीसी नियमानुसार, खेळाडू १ ते १०० यातील कोणताही जर्सी नंबर निवडू शकतात. मात्र, भारतीय क्रिकेटपटूंसाठी हा पर्याय आता मर्यादित झाला आहे. बीसीसीआय अधिकाऱ्याने पुढे म्हटले की, “सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये ६० जर्सी नंबर देण्यात आले आहेत. अशात कोणताही क्रिकेटपटू वर्षभरही क्रिकेटपासून दूर राहिला, तर आम्ही त्याचा जर्सी नंबर इतर कुणाला देत नाहीत. अशात जो खेळाडू पदार्पण करेल, त्याच्याकडे ३० च्या आसपास जर्सी नंबर निवडण्याचा अधिकार असेल.

अलीकडेच, यशस्वी जयसवाल याने भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते, तेव्हा त्याने १९ जर्सी नंबर मागितला होता. मात्र, जर्सी नंबर १९ दिनेश कार्तिकचा आहे. जयसवाल राजस्थान रॉयल्सकडून हाच नंबर परिधान करून खेळतो. मात्र, बीसीसीआयने नकार दिल्यानंतर त्याने ६४ जर्सी नंबर घेतला.