वेंगुर्ला : नाणोस येथील एस बॉईज क्लब आयोजीत 'एक गाव एक संघ' टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत रीलायन्स आरोंदा संघाला हरवून राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना तळवडे संघाने गोपाळ बटा, दाजी धुरत, रोहन लोणे, भुषण गडेकर यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर 6 षटकात 75 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युतरादाखल खेळताना राजाराम वॉरियर्स संघाच्या गोलंदाजानी केलेल्या गोलंदाजीच्या समोर आरोंदा संघ केवळ 48 धावाच जमवू शकला.
अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून अष्टपैलू रोहन लोणे, स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज राजाराम वॉरियर्स संघाचा तेजस पडवळ, उत्कृष्ट फलंदाज राजाराम वॉरियर्स संघाचा दाजी धुरत तर स्पर्धेतील मालकावीर म्हणून पपन साळगावकरला सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे बक्षिस वितरण प्रसिद्ध उद्योजक राजाराम गावडे, नाणोस गावचे माजी उपसरपंच संजय नाणोसकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुधाकर नाणोसकर व मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ताच्या उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या संघाला 21 हजार 121 रोख व चषक, उपविजेत्या संघाला 11 हजार 111 रोख व चषक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर यांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.