चिपळूण येथील कॅरम, बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीचा डंका !

Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: March 09, 2023 20:57 PM
views 205  views

सावंतवाडी : डेरवण येथील विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट यांच्यातर्फे सोळा वर्षांखालील गटात घेण्यात आलेल्या कॅरम व बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या बारा विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आठ पारितोषिके मिळवली. 

कॅरम स्पर्धेत चार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. चाळीस स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.बारा वर्षीय राष्ट्रीय खेळाडू साक्षी रामदुरकर हिने तिसरा क्रमांक पटकावून ब्राँझ मेडल मिळवले.

बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घेतलेल्या आठ विद्यार्थ्यांपैकी तब्बल सात विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळवली.अठ्ठ्यात्तर स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.ॲकेडमीची सर्वात लहान सात वर्षांची विद्यार्थिनी निधी गवस हिने पहिल्यांदाच स्पर्धेत सहभाग घेऊन नऊ वर्षांखालील गटात दुसरा क्रमांक मिळवून सिल्वर मेडल प्राप्त केले. दहा वर्षीय तन्मय शितोळे याने बारा वर्षांखालील गटात पहिला क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त केले. भूमी कामतने मुलींच्या गटात तिसरा क्रमांक मिळवला. आठ वर्षीय राष्ट्रीय खेळाडू यश सावंत याने अनरेटेड गटात पहिला क्रमांक पटकावला.

रेटिंग प्लेअरच्या गटात राष्ट्रीय खेळाडू विभव राऊळ याने पहिला क्रमांक आणि भावेश कुडतरकर याने दुसरा क्रमांक पटकावला. कुडाळ येथील अनुज व्हनमाने याने मुख्य गटात तेरावा क्रमांक मिळवला.विजेत्या खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, इत्यादी ठिकाणच्या स्पर्धकांचा सहभाग होता. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांचाच या स्पर्धेत सहभाग होता. सातत्याने पाच वर्षे मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन वर्चस्व ठेवले. सर्व विद्यार्थ्यांना ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर आणि बुद्धिबळ राष्ट्रीय प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे यांचे मार्गदर्शन लाभले.