सावंतवाडी ः चिपळूण-डेरवण येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई ॲकॅडमीची साक्षी रामदुरकर हिने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.
अकरा वर्षीय साक्षीने लातूर, नागपूर, मुंबईतील प्रतिस्पर्ध्यांवर मात करून चौदा वर्षांखालील गटात राज्य स्तरावर चौथा क्रमांक पटकावला. मुक्ताई ॲकॅडमीचे अध्यक्ष आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ कॅरम खेळाडू, प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षीने हे उल्लेखनीय यश मिळवले.
साक्षीने तालुक्यात, जिल्ह्यात आणि विभागीय कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारी आणि राष्ट्रीय स्तरावर निवड होणारी जिल्ह्यातील एकमेव खेळाडू होण्याचा बहुमान मिळवला. साक्षीने मागील सहा महिन्यात केलेल्या सरावाच्या जोरावर अनुभवी आणि दिग्गज खेळाडूंचा पराभव करून हे यश प्राप्त केले.
साक्षीला रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ कॅरम खेळाडू, प्रशिक्षक रवी घोसाळकर यांच्या हस्ते आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडाधिकारी किरण बोरावडेकर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव मिलिंद साप्ते, इतर मान्यवरांच्या उपस्थितीत चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
मागील आठ वर्षात मुक्ताई ॲकॅडमीच्या चार मुलींची राष्ट्रीय स्तरावर आणि बारा मुला - मुलींची राज्य स्तरावर निवड झाली. कौस्तुभ पेडणेकर यांनी यावेळी आपले वडील आणि सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक कै.सूर्यकांत पेडणेकर यांचे स्वप्न पूर्ण करत असल्याचे सांगितले.