
सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालय व कुडाळ हायस्कूल यांच्या संयुक्त आयोजनाखाली कुडाळ येथे शालेय विभागस्तरीय कॅरम स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मुलींच्या सतरा वर्षे वयोगटात मुक्ताई ॲकेडमीच्या चौदा वर्षीय साक्षी रामदुरकर हीने चौथा क्रमांक पटकावला.
साक्षीने उत्कृष्ट खेळ करुन सलग चौथ्या वर्षी राज्यस्तरावर झेप घेतली. राज्यस्तरीय स्पर्धा डेरवण, चिपळूण येथे होणार आहेत. यापूर्वी देखील शालेय तसेच महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठीदेखील साक्षीची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे विभागस्तरीय बुदधिबळ स्पर्धेसाठी आणि राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी सातत्याने चार वर्ष निवड होणारी, साक्षी ही कोकणातील एकमेव विदयार्थीनी आहे. मागील दहा वर्षात मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांनी जिल्ह्यातील शेकडो विदयार्थ्यांना कॅरमचे प्रशिक्षण दिले आहे. त्यापैकी तीन विदयार्थिनींची राष्ट्रीय स्तरावर आणि चौदा विदयार्थी-विदयार्थिनींची राज्य स्तरावर निवड झाली आहे. श्री.कौस्तुभ पेडणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली साक्षीने हे यश मिळवले आहे. सर्व स्तरातून साक्षीचे कौतुक करण्यात येत आहे. राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी साक्षीला शुभेच्छा देण्यात येत आहेत.














