कॅरम - बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांचे वर्चस्व

Edited by: विनायक गांवस
Published on: August 21, 2025 21:24 PM
views 26  views

सावंतवाडी : क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रिडाधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी जिल्हास्तरावर निवड करण्यासाठी तालुक्यांमध्ये शालेय कॅरम व बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीत प्रशिक्षण घेत असलेल्या सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला आणि मालवण या तालुक्यांमध्ये चोवीस विदयार्थी आणि विदयार्थिनींनी सहभाग घेतला. 

त्यापैकी सोळा विदयार्थी आणि विदयार्थिनींची जिल्हास्तरीय कॅरम व बुदधिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी तालुकास्तरावर वर्चस्व ठेवले. साक्षी रामदुरकर, गार्गी सावंत, भुमि कामत, सई परुळेकर, माहिरा खुल्ली, आस्था लोंढे, चिदानंद रेडकर, पार्थ गावकर, अथर्व वेंगुर्लेकर, वसंत गवस, प्रबोध जाधव, सोनल मराठे, अर्श पोटफोडे, प्रज्योत पुराणिक, इत्यादी विदयार्थी, विदयार्थिनींनी यश संपादन केले.  मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर सरांनी यशस्वी विदयार्थ्यांचे कौतुक करतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त विदयार्थी, विदयार्थिनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पोहोचावेत असा आपला प्रयत्न असल्याचे सांगितले. गेल्या दहा वर्षात कॅरम व बुदधिबळ खेळात मुक्ताई ॲकेडमीच्या तब्बल अठरा विदयार्थी, विदयार्थिनींची राज्य स्तरावर आणि तीन विदयार्थिनींची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्य व राष्ट्रीय स्तरावर विदयार्थ्यांची निवड होणारी कोकणातील ही एकमेव ॲकेडमी आहे. जिल्हास्तरावर निवड झालेल्या यशस्वी विदयार्थ्यांना राष्ट्रीय प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे देखील पेडणेकर म्हणाले. सर्व विदयार्थ्यांना कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर आणि बाळकृष्ण पेडणेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. यशस्वी विदयार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.