मेस्सी डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार

14 डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी
Edited by: ब्‍युरो न्यूज
Published on: August 01, 2025 18:11 PM
views 52  views

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. मेस्सी १४ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भारतात येत आहे. तो १३ ते १५ डिसेंबर दरम्यान भारतात असेल आणि एकूण तीन शहरांना भेट देईल.

रिपोर्टनुसार, मेस्सी १३ ते १५ डिसेंबर दरम्यान कोलकाता, दिल्ली आणि मुंबईला भेट देणार आहे. तो १४ डिसेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होईल. मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) च्या एका सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, काही क्रिकेटपटू देखील या कार्यक्रमात सहभागी होतील.

याशिवाय, मेस्सी कोलकात्यालाही भेट देणार आहे आणि ईडन गार्डन्स येथे त्यांचा सन्मान केला जाईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. मेस्सी कोलकात्यात मुलांसाठी फुटबॉल कार्यशाळेचे आयोजन करणार आहेत आणि फुटबॉल क्लिनिकचेही उद्घाटन करणार आहे.

यापूर्वी, ६ जून रोजी केरळचे क्रीडा मंत्री व्ही. अब्दुरहिमान यांनी पुष्टी केली होती की लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना फुटबॉल संघ ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये एक मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी केरळला भेट देईल. हा सामना तिरुअनंतपुरममधील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होईल. याबद्दल केरळ सरकारशी सल्लामसलत करण्यात आली आहे.

मेस्सीसह अर्जेंटिना फुटबॉल संघाने २०११ मध्ये व्हेनेझुएलाविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यासाठी शेवटचा भारत दौरा केला होता. अर्जेंटिना आणि व्हेनेझुएला यांच्यातील हा सामना २ सप्टेंबर रोजी कोलकात्यातील साल्ट लेक स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात निकोलस ओटामेंडीने दुसऱ्या हाफमध्ये मेस्सीच्या सहाय्याने हेडर गोल करून अर्जेंटिनाला १-० असा विजय मिळवून दिला.

अर्जेंटिना हा सध्याचा विश्वविजेता आहे. २०२२ च्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पेनल्टी शूटआउटमध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव करून संघाने विजेतेपद पटकावले. अर्जेंटिनाने यापूर्वी १९८६ मध्ये विजेतेपद जिंकले होते. हे अर्जेंटिनाचे एकूण तिसरे विजेतेपद होते. १९७८ मध्ये संघ पहिल्यांदाच विश्वविजेता बनला.