मराठमोळ्या ऋतुराजचा धमाका सुरूच ; झळकावले सलग दुसरे अर्धशतक !

लखनऊला चेन्नईने दिले २१८ धावांचे लक्ष्य
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: April 03, 2023 21:38 PM
views 194  views

चेन्नई : ऋतुराज गायकवाड आणि कॉनवे यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने 217 धावांचा डोंगर उभारला. चेन्नईकडून प्रत्येक फलंदाजाने धावांचा पाऊस पाडला. चेन्नईने सात विकेटच्या मोबदल्यात २१७ धावा उभारल्या. राहुलच्या नेतृत्वातील लखनऊ संघाला दुसऱ्या विजयासाठी २१८ धावांची गरज आहे. डेवेन कॉनवे आणि ऋतुराज यांनी ११० धावांची सलामी दिली. 

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याने विस्फोटक फलंदाजी करत सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. आयपीएलच्या १६ व्या हंगामातील पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाड याने विस्फोटक फलंदाजी केली होती. गुजरातविरोधात ऋतुराजने ९२ धावांचा पाऊस पाडला होता. त्यानंतर सोमवारी लखनऊविरोधात त्याने अर्धशतकी खेळी केली. प्रत्येक हंगामानंतर ऋतुराज गायकवाड याची फलंदाजी अधिक निखारत असल्याचे दिसतेय. 

नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नईकडून कॉनवे आणि ऋतुराज सलामीसाठी मैदानात उतरले. दोघांनी चेन्नईला आक्रमक सुरुवात करुन दिली. ऋतुराज गायकवाडने  मैदानाच्या चारीबाजूने फटकेबाजी केली. ऋतुराजने ३१ चेंडूत ५७ धावांचा पाऊस पाडला. या खेळीत ऋतुराजने ४ षटकार आणि ३ चौकार लगावले. रवि बिश्नोईच्या गोलंदाजीवर ऋतुराजची खेळी संपुष्टात आली. ऋतुराजने कॉनवेसोबत ९ षटकात ११० धावांची सलामी दिली. ऋतुराजसमोर लखनऊची गोलंदाजी दुबळी जाणवत होती. 



षटकारांचा पाऊस -

टीम इंडियात सलामी फलंदाजाच्या शर्यतीत असणाऱ्या ऋतुराज गायकवाडने आयपीएलमधील पहिल्या दोन्ही सामन्यात विस्फोटक फलंदाजी केली. देशांतर्गत क्रिकेटमध्येही ऋतुराज गायकवाड याने धावांचा पाऊस पाडलाय. आयपीएलच्या १६ व्या हंगामाच्या सुरुवातीलाच ऋतुराज गायकवाड याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. ऋतुराज गायकवाड याने आतापर्यंत ७ चौकार आणि १३ षटकार लगावले आहेत.