पैलवानांनी ठोकले शड्डू !

गाजवला 'मल्लसम्राट केसरी'च्या कुस्तीचा आखाडा
Edited by: विनायक गांवस
Published on: January 07, 2024 18:50 PM
views 197  views

 सावंतवाडी : महाराष्ट्राच्या मातीतील मर्दानी खेळ कुस्तीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मल्लसम्राट प्रतिष्ठान सावंतवाडी आणि नामदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांनी पुढाकार घेत 'मल्लसम्राट केसरी' कुस्ती स्पर्धा २०२४ च आयोजन केलं असून रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभीला आख्याड्यात रंगलेल्या सामन्यांनी उपस्थितांची मनं जिंकली. महिला व पुरुष गटात या कुस्त्या रंगल्या. जिल्ह्यातील कुस्ती प्रेमी यानिमित्ताने सावंतवाडीत दाखल झाले होते.


 'मल्लसम्राट केसरी कुस्ती स्पर्धा २०२४' च आयोजन सावंतवाडीत करण्यात आलं होतं. याचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, महिला पॉवर लिफ्टर प्रसन्ना परब, आयुष पाटणकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व 'ढ' मंडळींचा विशेष सन्मान करण्यात आला.

दरम्यान, मनोगतात मल्लसम्राट कुस्तीस १९८५ ला सिंधुदुर्गात सुरुवात केली होती. त्यापासून आजतागायत जिल्ह्यात आम्ही कुस्ती जपण्याचा प्रयत्न करत आहोत. नवीन पिढी कुस्तीत उतरताना दिसत आहे. आजच्या स्पर्धेत ते दिसून येत आहे. भविष्यात क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर प्रमाणे कुस्तीला हिरा देण्याच काम ही सावंतवाडीची माती करेल असा विश्वास कुस्तीपटू वाय. पी. नाईक यांनी व्यक्त केला‌. तर सिंधुदुर्गातून पैलवान तयार होण्यासाठी आम्हाला पाठिंबा द्यावा, येथील मुलांमध्ये ती ताकद आहे. फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज आहे असं ते म्हणाले.

तर सिंधुदुर्गात हवं तेवढं पाठबळ मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु, मल्लसम्राट प्रतिष्ठान व दीपकभाई मित्रमंडळानं यात पुढाकार घेतला आहे. यापुढे कुस्तीपटू युवक-युवतींना प्रोत्साहन अन् पाठबळ देण्याच काम यापुढे निश्चित केलं जाईल. सिंधुदुर्गचा 'मल्लसम्राट' राज्यात चमक दाखवेल असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.


यानंतर श्रीफळ वाढवून महिला आणि पुरुष अशा दोन गटातील कुस्त्यांना प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, चेअरमन बाबुराव कविटकर, तालुकाप्रमुख बबन राणे, सैनिक पतसंस्थेचे सुनील राऊळ, मल्लसम्राट प्रतिष्ठान अध्यक्ष जावेद शेख, गजानन नाटेकर, बाबू कुडतरकर, वाय.पी.नाईक, भारती मोरे, शुभांगी सुकी, निलीमा चलवाडी, परशुराम चलवाडी, समीरा खलील, कौस्तुभ पेडणेकर, सचिन हरमलकर, म.ल.देसाई, श्री.भिसे,ललित हरमलकर,उमाकांत वारंग, दत्तप्रसाद पाटणकर, भारत बेळेकुंद्री, पांडुरंग काकतकर, दाजी रेडकर, गणेश पाटील, सौरभ पाटील, अनिष पाटील, हर्षद मोर्जे, निलेश फोंडेकर, गौरव दळवी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सचिव ललित हरमलकर यांनी केल. तर सुत्रसंचालन प्रा. रूपेश पाटील यांनी तर आभार फिजा मकानदार यांनी मानले. 


दरम्यान, राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर या स्पर्धेस उपस्थित राहणार आहेत. तर स्पर्धेचा बक्षीस समारंभ  सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ  संजू परब यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तर या 'मल्लसम्राट केसरी'मानाची गदा कोण पटकविणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं असून सावंतवाडीच्या मातीत रंगलेल्या या कुस्ती स्पर्धेला जिल्हाभरातील कुस्ती प्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला.